Loksabha 2019 : अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

  • खोतकर-दानवेंची दिलजमाई प्रचार सभेतही रंगली
  • दानवे हे माझी मेहबुबा असल्याचे खोतकरांचे वक्तव्य
  • खोतकरांची अमित शहांकडे विशेष मागणी

 

लोकसभा 2019
जालना : शिवसेनेचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि जालन्यात महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात लोकसभा उमेदवारीवरुन निर्माण झालेली तेढ सर्वश्रुत आहे. मात्र खोतकर यांनी 'दानवे हे माझी मेहबुबा' असल्याचे हास्यास्पद वक्तव्य केले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी जालन्याची जागा भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रतिष्ठेची झाली होती. दानवे यांच्या उमेदवारीपुढे खोतकर शड्डू ठोकून उभे होते. पण पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने हे भांडण थांबले. अर्जुन खोतकरांनी बाण ठेवला आणि जालन्यातील तिढा सुटला. त्यानंतर खोतकरांनी दानवे यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले. आता ही दिलजमाई इतकी वाढली आहे की 'दानवे हे माझी मेहबुबा आहेत, मी त्यांच्यावर प्रेम करतो,' असे वक्तव्य खोतकर यांनी भर सभेत केले आहे.

जालन्यात महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात जाहीर सभेत अर्जुन खोतकर म्हणाले, 'रावसाहेब दानवे ही माझी मेहबुबा, मी त्यांच्यावरती प्रेम करतो. ते माझ्यावर इशक करतात.' हे ऐकताच सभेतील जनतेत एकच हशा पिकला. 

'गेली तीस वर्षे राज्याच्या विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत काम करताना अमित भाईंचा आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळाला असून महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने रावसाहेब दानवेंना केंद्रात पाठवू,' असा दावा खोतकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच 'केंद्रात चांगली जागा द्यावी,' अशी मागणी देखील खोतकरांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे व्यासपीठावर उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Khotkar says I Love Raosaheb Danve at Loksabha Public Meeting in Jalna