Loksabha 2019 : देशाला मोदींसारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज - पंकजा मुंडे

मंगेश शेवाळकर
रविवार, 7 एप्रिल 2019

एका सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्‍ती देशाचा पंतप्रधान होतो व देशाचे संरक्षण करतो. मात्र त्‍यांना विरोधकांकडून हिणवले जात आहे. - पंकजा मुंडे

लोकसभा 2019
हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले.

येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्‍या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत त्‍या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्‍हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार तान्‍हाजी मुटकुळे, आमदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेना जिल्‍हाप्रमुख संतोष बांगर, मिलिंद यंबल यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्‍हणाल्‍या की, ब्रिटिशांनी फोडा आणि राज्‍य करा ही निती अवलंबली होती. ब्रिटिश गेले, मात्र त्‍यांचे औलादी येथे आहेत. ब्रिटीशांचेच काम काँग्रेस व राष्ट्रवादी करत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. देशद्रोहाचा गुन्‍हा रद्द करणार, अशी भाषा करणारे देशाला कसे परवडतील असा सवाल यांनी केला. 

एका सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्‍ती देशाचा पंतप्रधान होतो व देशाचे संरक्षण करतो. मात्र त्‍यांना विरोधकांकडून हिणवले जात आहे. पंतप्रधान फक्‍त गांधी घराण्यातील लोकांनी व्‍हायचे काय असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला. देशाला सध्या कणखर नेतृत्‍वाची गरज असून हे नेतृत्‍व पंतप्रधान नरेंद्र मोदी देवू शकतात, असा विश्वास त्‍यांनी व्यक्‍त केला.

राजकारणात काका पुतण्याची झळ आम्‍हालाही बसली आहे. ग्रामविकास मंत्री झाल्‍यानंतर आपल्‍याला रोखण्यासाठी विरोधी पक्ष पद दिलेल्‍यांनी तोडपाणी करण्यात हयात घालवल्‍याचा आरोप श्रीमती मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्‍यावर केला. आमच्‍या पक्षात असताना बीडमध्ये भाजपचे कमी आमदार विजयी होत होते, मात्र आता पक्षातून गेल्‍यानंतर भाजप आमदारांची संख्या वाढली. तर राष्‍ट्रवादीच्‍या आमदारांची संख्या घटली. हा त्‍यांचा पायगुण असल्‍याचे सांगत श्री. मुंडे यांच्‍यावर टीका केली. बहिणीची निवडणूक सोडून हिंगोलीत भावाच्‍या प्रचारासाठी हिंगोलीत आले. बीडमध्ये आम्‍ही निपटून घेवू असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country needs a strong leadership like Modi says Pankaja Munde