Loksabha 2019 : बीडच्या निकालाचे भविष्य पाहूनच क्षीरसागर राष्ट्रवादीतून बाहेर - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ओबीसी लिडरशिप हा धनंजय मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील कळीचा मुद्दा ठरला होता. धनंजय मुंडे यांच्याकडून कायम संदीप क्षीरसागर यांना बळ देऊन जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. 

लोकसभा 2019
बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि पक्षाचे विधीमंडळातील उपनेते असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी दुपारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला असून काही वेळाने त्यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांचे पक्षात प्रस्थ वाढल्यानंतर त्यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देत जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले. त्याला पक्षाकडूनही बळ मिळत असल्याने जयदत्त क्षीरसागर अस्वस्थ होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशावर धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे. उद्याच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला विधानसभा मतदार संघनिहाय जी लिड मिळेल त्यात बीड विधानसभेतून सर्वाधिक लिड राष्ट्रवादी उमेदवाराला असेल. त्यामुळे हा निकाल पाहून त्यांना भाजप किंवा शिवसेनेने प्रवेश दिला नसता म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त निवडल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. आता धनंजय मुंडे यांचा हा विश्वास किती खरा ठरतो आणि त्याला जयदत्त क्षीरसागर काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaydutt Kshirsagar exit NCP after seeing Beeds future results Dhananjay Munde