Loksabha 2019 : आरक्षण नाही तर मतदान नाही - धनगर समाज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

आघाडीच्या सरकारने अनेक वर्षे झुलवत ठेवल्यानंतर आश्‍वासन देऊनही गेल्या पाच वर्षांत भाजपने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आरक्षण नाही, तर मतदान नाही, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे.

जालना - आघाडीच्या सरकारने अनेक वर्षे झुलवत ठेवल्यानंतर आश्‍वासन देऊनही गेल्या पाच वर्षांत भाजपने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आरक्षण नाही, तर मतदान नाही, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. ही भूमिका प्रत्येक गावांत पोचविण्यासाठी मोहीम राबणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे व डॉ. सुभाष माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

समाजाच्या जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज येथे बैठक झाली. मराठवाडा संघटक माणिकराव राऊत, विठ्ठल रांधवन, अलका शेजुळ आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी समाजाला गृहीत धरले आहे. लोकसभा निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात आरक्षणाचा मुद्दा नाही. कुणीही त्यावर बोलत नाही. राजकीय पक्षांना आरक्षणावर बोलते करण्यासाठी ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

"जानकर यांनी राजीनामा देऊन आरक्षण लढ्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे होते, अशी समाजाची भावना होती. त्यांनी तसे न केल्यामुळे सत्तेसाठी ते लाचार आहेत, असा अर्थ यातून निघतो.'
- लहुजी शेवाळे, अध्यक्ष, जय मल्हार सेना

Web Title: Loksabha Election 2019 Dhangar Society Reservation Voting