Loksabha 2019 : जवानांच्या नावावर मते मागणाऱ्यांना गाडा - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

राज ठाकरे यांची पहिली सभा नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज सायंकाळी झाली. मोदींच्या सभेनंतर राज यांच्या आजच्या सभेविषयी नांदेडकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. राज यांनी आपल्या भाषणात सुरवातीची तब्बल तीस मिनिटे मोदी सरकारवर टीकेचे प्रहार केले.

नांदेड - मागील पाच वर्षांत लोकांना केवळ स्वप्ने दाखविली. खोट्या घोषणा केल्या. आता विकासावर बोलण्यासाठी काहीच शिल्लक नाही, म्हणून हुतात्मा जवानांच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत आहेत. त्यांचे हे कुटील राजकारण हाणून पाडा. मोदी व अमित शहा या जोडगळीपासून देशाला वाचवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.

राज ठाकरे यांची पहिली सभा नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज सायंकाळी झाली. मोदींच्या सभेनंतर राज यांच्या आजच्या सभेविषयी नांदेडकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. राज यांनी आपल्या भाषणात सुरवातीची तब्बल तीस मिनिटे मोदी सरकारवर टीकेचे प्रहार केले.

राज म्हणाले की, मोदी यांच्याविषयी मला सुरवातीला मिळालेल्या माहितीनुसार व रतन टाटा यांच्या सूचनेनुसार मी गुजरातला जाऊन त्यांचे काम पाहिले. मात्र, मला जे दाखवले गेले त्यापेक्षा हा माणूस वेगळा असल्याची जाणीव मला झाली. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षांपासून मी सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहे. त्यांच्या सरकारने ज्या घोषणा केल्या त्या सर्व फसव्या निघाल्या. एकही योजना यशस्वी न झाल्याने त्यांना अचानक देशप्रेम आठवू लागले. पुलवामात जवान हुतात्मा होतातच कसे? त्या अतिरेक्‍यांपर्यंत आरडीएक्‍स पोचले कसे? हे तुमच्या सरकारचे अपयश नाही का? त्या हल्ल्यानंतर तुम्ही पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये "एअर स्ट्राईक' करता आणि सैन्याकडून कसलीही अधिकृत माहिती यायच्या आधीच अमित शहा पहाटेच 350 पाकिस्तानी अतिरेक्‍यांचा खातमा केल्याचे सांगतात. तर सैन्यदलाचे प्रमुख म्हणतात आमच्याकडे आकडेवारी नाही. आम्हाला जिथे हल्ला करण्याचा आदेश दिले तिथे आम्ही केवळ हल्ला केलाय. ही फसवणूक नाही का? हुतात्मा जवानांच्या शौर्यावर मते मागण्यासाठी हा केलेला बनाव होता. हे असे करणार हे मी साडेचार वर्षांपूर्वीच सांगितले होते. त्यामुळे हे सरकार अत्यंत खोटारडे आहे.

मुख्यमंत्री गप्प का?
मोदींप्रमाणेच राज्यातील फडणवीस सरकारही धादांत खोटे बोलत राज्य करत आहे. एक लाख 265 सिंचन विहिरी बांधल्याचा दावा ते करतात. त्या विहिरी गेल्या कुठे? माझा मराठवाडा दुष्काळाने तहानलाय. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. आमच्याच मराठवाडा व नगर, नाशिकला पाण्याच्या प्रश्नावर भांडायला लावले जातेय. आमचे पाणी मात्र गुजरातला पळविले जातेय. त्या विरुद्ध हे मुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत. ते काढतीलच कसे? हा बसवलेला मुख्यमंत्री आहे.

हिंमतीवर आलेला मुख्यमंत्री बोलत असतो. हुतात्मा जवानांच्या नावावर मते मागायला ते जवान निवडणुकीत उभे आहेत का? निवडणुकीला तुम्ही उभे आहात ना? मग त्यांच्या शौर्यावर तुम्ही मते का मागता? अशी जोरदार टीका राज यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Raj Thackeray Speech Politics