सभा ऐकण्यासाठी 'त्यांनी' लांबवला विवाह सोहळा!

कृष्णा पिंगळे
सोमवार, 8 एप्रिल 2019

नेते विवाहाला उपस्थित राहणार म्हणून विवाहाची वेळ लांबवल्याच्या घटना अनेकदा पाहावयास मिळतात; परंतु वऱ्हाडाला नेत्याची सभा ऐकायला मिळावी म्हणून विवाह सोहळाच दिवसभर लांबवल्याचे वाघलगाव (ता. सोनपेठ) येथे रविवारी दिसून आले.

सोनपेठ - नेते विवाहाला उपस्थित राहणार म्हणून विवाहाची वेळ लांबवल्याच्या घटना अनेकदा पाहावयास मिळतात; परंतु वऱ्हाडाला नेत्याची सभा ऐकायला मिळावी म्हणून विवाह सोहळाच दिवसभर लांबवल्याचे वाघलगाव (ता. सोनपेठ) येथे रविवारी दिसून आले.

वाघलगाव येथील अशोक साळवे यांची मुलगी सीमा हिचा पाथरी तालुक्‍यातील अशोक ढवळे यांचे पुत्र सूरज याच्याशी आज सकाळी अकराला विवाह होता. दुसरीकडे परभणी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची पाथरी येथे सभा होती.

बऱ्याच दिवसांनंतर ऍड. आंबेडकर हे पाथरीत येत असल्याने त्यांची सभा ऐकण्याची इच्छा वऱ्हाडी मंडळींनी वरपिता अशोक ढवळे यांच्याकडे व्यक्त केली. ढवळे यांनी ती मान्य केली व वधुपिता अशोक साळवे यांना फोन करून वऱ्हाड सभेसाठी जाणार असल्याने विवाहास उशीर होणार असल्याची कल्पना दिली. ठरल्याप्रमाणे वरपिता, वरमाता यांच्यासह वऱ्हाडी ऍड. आंबेडकरांच्या सभेसाठी उपस्थित होते. सभा आटोपून दुपारी चारच्या सुमारासार वऱ्हाडी वाघालगाव (ता. सोनपेठ) येथे दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी उशिरा सूरज व सीमा यांचा मंगल परिणय उत्साहात झाला.

Web Title: Marriage Prakash Ambedkar Speech