Loksabha 2019  : मोदींनी खोटी आश्‍वासने देत फसविले - असदुद्दीन ओवेसी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

खोटे बोलणारे मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

औरंगाबाद - ""नरेंद्री मोदींनी जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण झाली का? त्यांनी खोटी आश्‍वासने देत जनतेला फसविले. भाजपच्या संकल्पपत्रात दहशतवादाला थारा देणार नाही, असे म्हणणारे मोदी आता दहशतवादाचा आरोप असणाऱ्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना तिकीट कसे काय दिले, खोटे बोलणारे मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली. गुरुवारी (ता. 18) किराडपुरा परिसरात झालेल्या सभेत ते बोलते होते. 

ओवेसी म्हणाले, ""दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन देणाऱ्यांनी एका वर्षात पाच लाखसुद्धा नोकऱ्या दिल्या नाहीत. नोटाबंदीने 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. गरिबांचे हाल झाले. आता कुठे आहे काळा पैसा ते सांगा. सगळीकडे सोने, नगदी रोकड पकडली जात आहे. एवढा पैसा कुठून आला. मग नोटाबंदीचा फायदा काय झाला,'' असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांनी औरंगाबाद शहरातील पाणी समस्या, पाकिस्तान, दहशदवादावर विचार मांडून विरोधी पक्षातील उमेदवारांवर जोरदार टीका केली. ओवेसी यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलच जे पक्षापासून लांब गेले आहे त्यांना पुन्हा परत जवळ येण्याचे भावनिक आवाहन केले. 

ओवेसी-आंबेडकर यांची आज संयुक्त सभा 
वंचित बहुजन आघाडी-एमआयएमतर्फे संयुक्त सभा शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता जबिंदा मैदानावर होणार आहे. सभेला असदुद्दीन ओवेसी आणि ऍड. प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. याच मैदानावर वंचित बहुजन आघाडीची राज्यातील पहिली सभा झाली होती. आता पुन्हा त्याच मैदानावर सभेसाठी वंचित आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM president Asaduddin Owaisi criticized Narendra Modi