Election Results : ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातातून मराठवाडा गेला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खरे तर, अशोक चव्हाण यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याऐवजी प्रदेशाध्यक्षपदाच्या कामात वेळ दिला असता तर कदाचित कॉंग्रेसवर ही वेळ आलीच नसती.

औरंगाबाद : शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळविला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या धक्कादायक पराभवाने मराठवाडाच नव्हे, तर राज्यभरातील कॉंग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खरे तर, अशोक चव्हाण यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याऐवजी प्रदेशाध्यक्षपदाच्या कामात वेळ दिला असता तर कदाचित कॉंग्रेसवर ही वेळ आलीच नसती. अर्थात रिंगणात उतरल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराने विजयी होणे अपेक्षित मानले जात होते. अशोक चव्हाणांप्रमाणेच इतरही अनेक निकालांनी भल्याभल्यांचे अंदाज चुकविल्याने ही निवडणूक कायमचीच लक्षात राहील. राज्यभरात बहुजन वंचित आघाडीने अनेक ठिकाणी प्रचंड मतदान घेतले. कॉंग्रेस पक्षाने या सर्व घटकांकडे तितकेसे गांभीर्याने बघितले नाही, म्हणूनच यशपाल भिंगेंसारख्या एका तरुणाने नांदेडमध्ये चव्हाणांची कोंडी केली. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी होऊन नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात समावेश होऊ शकणाऱ्या विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेना आणि भाजपला चांगलाच भोवला. आपसांतील गटबाजी आणि वादामुळे विस्कळित झालेल्या संघटनाला शेवटच्या टप्प्यापर्यंत नीट करता आले नाही. त्यातच कॉंग्रेस पक्षाची मोठी पीछेहाट झाल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील आणि खासदार खैरे यांच्यात शेवटपर्यंत झुंज झाली. अर्थात या झुंजीत केवळ एका फेरीचा अपवाद वगळता जलील यांनी अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवली. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी धडाडीने लोकसभा रिंगणात उडी घेत ते तीन लाखांच्या जवळपास पोचले. हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीविषयी पूर्वीही आणि पुढेही चर्चा होतच राहील. जाधव यांनी खैरे यांना पाडले की इम्तियाज जलील यांना निवडून आणले, यावर रंगतदार चर्चा होतील. या चर्चांना आता फारसा अर्थ राहिला नाही. उलट समोरच्या बाजू कमकुवत आहेत आणि याही परिस्थितीत कॉंग्रेस एकसंध होत नाही, हे हेरून इम्तियाज जलील यांनी जोखीम पत्करत उमेदवारी खेचून आणली. इम्तियाज जलील यांच्याविषयी बिगरमुस्लिम मतदारांमध्येही खूप चांगले मत आहे. त्याचाच फायदा त्यांना झाला. 

अपेक्षेप्रमाणे लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे यांनी सहजपणे बाजी मारली. बीड लोकसभा मतदारसंघात खूप चुरस होईल, अशी जोरदार चर्चा होत राहिली. प्रत्यक्षात पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी अत्यंत सहजपणे ही निवडणूक जिंकली.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सुरवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राणा जगजितसिंह यांचे पारडे जड होते. अखेरच्या टप्प्यात सर्वच मतदारसंघांत ग्रामीण भागात मोदींच्या बाजूने मतदान झुकल्याचे वरवर दिसते आहे. त्याचा फायदा शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांना नक्कीच झाला. हिंगोली मतदारसंघात राजीव सातव यांनी स्वतःऐवजी ऍड. शिवाजी वानखेडे यांना मैदानात आणले. शिवसेनेचे हेमंत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा खूप प्रचार झाला. त्याचा फारसा फायदा वानखेडेंना झाला नाही.

परभणीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर हे शिवसेनेचे संजय जाधव यांच्यावर असलेल्या नाराजीचा फायदा उचलतील, असे दिसत होते. विटेकर यांचे शिवसेनेतील नातेवाईक त्यांना मदत करतील, असेही बोलले जात होते. प्रत्यक्षात घडले उलटेच. एकूणच, मराठवाड्यात हिंदुत्ववादी पक्षाच्या बाजूने अर्थातच मोदींच्या बाजूनेच मतदान झाले आहे. औरंगाबादला खैरे आणि जाधव यांना झालेले मतदानही कुणीही आले तरी मोदींनाच पाठिंबा देतील, यामुळेच झाले. लोकसभेत शिवसेनेची व्होट बॅंक पहिल्यांदाच दुभंगली असे नाही. यापूर्वी शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीतूनही असे घडले होते. औरंगाबाद वगळता सात जागा जिंकून युतीने पुन्हा मराठवाड्यातील शक्तिस्थान सिध्द केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and congress alliance defeated by BJP and sena