Loksabha 2019 : काँग्रेस म्हणजे जातीय विष पेरणारा पक्ष : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा पक्ष आहे. - नितीन गडकरी

औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा पक्ष असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता.20) केला.

जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासाठी पैठण येथे नितीन गडकरी यांची जाहिर सभा घेण्यात आली. या सभेस पैठणचे आमदार संदीपान भुमरे, उमेदवार रावसाहेब दानवे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगराध्यक्ष सुरज लोळगे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, सुलोचना साळूंके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील शिंदे, सोमनाथ परदेशी, दत्ता गोर्डे, ऍड. कांतराव औटे, शेखर पाटील, प्रमोद राठोड उपस्थित होते. गडकरी म्हणाले,आम्ही गंगा स्वच्छ केली नसती तर प्रियंका मॅडम तुम्हाला प्यायला पाणी मिळालं असता का? आज पाण्यावर वाहूतक तयार केली म्हणून तुम्हाला वाराणसीला बोटीतून जाता आल्याचा टोला गडकरी यांनी प्रियंका गांधीला लगावला.
 
पश्‍चिम घाटातून वाहून जाणार पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत, 40 हजार कोटींची योजना असून ते पाणी जायकवाडीला देण्याचं नियोजन होईल, डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. अर्धवट रखडलेली प्रकल्प केंद्राची मदत घेऊन पूर्ण करू, मराठवाड्यासह देशात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्यामुळे नदीजोड प्रकल्प हाती घेतलेत, त्यासाठी 60 हजार कोटींची असून 40 टक्‍क्‍यांपर्यंत सिंचन वाढणार आहे. 

संत एकनाथांच्या मंदिरापासुनचा पंढरपुरला जोडणारा पालखी दिंडी मार्गाला जोडला जाईल. महाराष्ट्रातील सर्व देवस्थानाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे या सरकारच्या काळात झाली आहे. सरकारने पाच वर्षात विकासाची कामे केली. माझ्या विभागात झालेल्या कामात एकही भ्रष्टाचार झाला नाही,रस्त्यावर 200 वर्ष खड्डा पडणार नाही, असे काम केल्याचा दावाही गडकरी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari Criticizes on Congress Party over Communal Issue