Loksabha 2019 : नेहरु-गांधी घराण्याच्या त्यागाचा सन्मान करा अन्यथा... - शरद पवार 

sharad pawar criticised to narendra modi on the topic of nehru gandhi family at Bajrang Sonavanes public meeting
sharad pawar criticised to narendra modi on the topic of nehru gandhi family at Bajrang Sonavanes public meeting

लोकसभा 2019
आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदींना दिला. 

'नरेंद्र मोदी सभांमध्ये दुष्काळ, बेरोजगारी आणि शेतकरी यांच्याऐवजी माझ्यावर बोलतात. माझी चिंता करण्यापेक्षा या प्रश्नांवर बोला,' असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता. 14) आष्टी येथे झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, उमेदवार बजरंग सोनवणे, माजी मंत्री सुरेश नवले, राजेंद्र जगताप, उषा दराडे, जनार्दन तुपे, सुनिल धांडे, आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, 'नरेंद्र मोदी नेहमी मागच्या 60 वर्षांत काहीच झाले नाही असे सांगतात. मात्र, पंडित नेहरुंनी देशाला जगातील सर्वात मोठी लोकशाही दिली. इंदिरा गांधींनी देशाच्या हिताचे रक्षण केले. पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगला देशची निर्मिती करुन जगाला भारताची ताकद दाखवून दिली. राजीव गांधी यांनी विज्ञानवादाचा स्विकार केल्यानेच देशात फोन आले. आता सर्वांच्या हातात असलेले मोबाईल त्यांचीच देण आहे. राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी देश सोडून जातील अशी चर्चा विरोधक करत असताना त्या खंबीरपणे उभ्या राहील्या. त्यांची मुले आज देशासाठी काम करत आहेत. त्यांचाही मोठा त्याग आहे. एकूणच नेहरु व गांधी घराण्याचा त्याग विसरता येणार नाही. त्यांच्या त्यागाचा पंतप्रधानांनी सन्मान करावा, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असे शरद पवार म्हणाले. 'देशाचे रक्षण करणारा पंतप्रधान असे मोदी स्वतःला म्हणवून घेतात. मग, पुलवामात स्फोटके कशी आली? आणि 40 सैनिकांना बलिदान का द्यावे लागले? असा सवाल करत सर्वपक्षीय बैठकीत या स्फोटाचा बदला घेण्यावर एकमत झाले. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांची भारतवापसी आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे झाली. या कायद्यामुळे जगातील देशांनी पाकिस्तानवर दबाव टाकला. मात्र, त्याचेही श्रेय मोदीच घेतात आणि 56 इंच छाती असल्याचे सांगतात. जर तुमची छाती 56 इंच आहे तर मग अडीच वर्षांपासून कुलभूषण जाधव यांना का परत आणले नाही?' असा सवालही शरद पवार यांनी केला. 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांत आता माझ्याविषयी आणि माझ्या कुटूंबाविषयी बोलत आहेत. मात्र, ज्यांना स्वत:चे कुटूंब नाही त्यांनी माझी काळजी करु नये. बेरोजगारी, शेतकरी व दुष्काळाबाबत त्यांनी बोलावे,' असा सल्लाही शरद पवारांनी दिला. 

'तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात मी कृषी मंत्री असताना पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी एवढ्यावर भागत नसून त्यांचे सरकार केंद्रात आल्यास संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत होते. पण, त्यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांऐवजी बड्या उद्योगपतींनी बुडविलेले बँकांचे एक लाख सहा हजार कोटी रुपये भरल्याचा' आरोप शरद पवारांनी केला. 

मराठा, धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला. दरम्यान, पवार यांनी स्थानिक राजकारणावरही टिप्पणी केली. ते म्हणाले, 'दिवंगत गोपीनाथराव मुंडेंची आठवण काढत त्यांनी कर्तृत्वाने देशात नाव केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातून उमेदवार असल्याने उमेदवार न देऊन राष्ट्रवादीने त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.' नाशिक येथील वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी 25 लाख रुपयांची पक्षातर्फे देणगी दिली. देशाच्या हितासाठी भाजपला दूर ठेवा, फसवणूक करणाऱ्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहनही शरद पवार यांनी केले. बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे, चंपावती पानसंबळ, अशोक हिंगे, हेमा पिंपळे, महेबुब शेख उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, राजेंद्र जगताप, सुनिल धांडे, जनार्दन तुपे, बाळासाहेब आजबे यांची भाषणे झाली. 

बजरंग सोनवणे हाती सोपविलेले काम फत्ते करणारे-
दरम्यान, बीडच्या उमेदवारीबाबत अनेक नावे होती. पण, जिल्ह्याने कायम शेतकरी हिताला प्राधान्य दि'लेले आहे. म्हणूनच शेतकरी कुटूंबातील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी साखर कारखाना उभा करुन मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप केला. भावही उत्तम दिला आणि शेतकऱ्यांचे सर्व पैसेही दिले. तर, पालकमंत्र्यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी नोटीस बजावल्याचे' शरद पवार यांनी सांगितले. 'बजरंग सोनवणे सोपविलेले काम फत्ते करुन दाखवितात. सत्ता बदलली तर बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी ताकद उभी करुन सर्व प्रश्नांची सोडवणूक करेल,' असे आश्वासही त्यांनी दिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com