Loksabha 2019 : आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई, 15 लाखांची बेहीशोबी रोकड जप्त

दिनेश गोगी
रविवार, 21 एप्रिल 2019

17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे.

उल्हासनगर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कमालीचे सक्रिय झालेल्या  उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी उल्हासनगर व मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. कल्याण लोकसभा निवडणूक 29 एप्रिलला होणार असून त्यात बेहिशोबी रोकड वाहनात बाळगणाऱ्या आसमींवर वॉच ठेवण्याचे तसेच अशा संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी नोडल अधिकारी युवराज भदाणे तसेच आचारसंहिता प्रमुखांना दिलेले आहेत. गिरासे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असणारे उल्हासनगर पालिकेच्या आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे, आचारसंहिता पथक प्रमुख संजय पवार यांनी म्हारळ नाक्यावर अलब्रत नाडर यांची कार थांबवून पोलिस उपनिरीक्षक बी. बी. चव्हाण यांच्या समक्ष कारची झाडाझडती घेतली असता त्यात साडेसहा लाख रुपयांची बेहिशोबी रोकड मिळाली. 

नाडर हे व्यावसायिक असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्याकडे तसा पुरावा सापडला नाही. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास  विजय बेहनवाल यांनी कॅम्प नंबर 3 मध्ये साईबाबा मंदिरा जवळ वाईन शॉप असणारे व्यापारी रवी रायसिंघानी यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 5 लाख रुपयांची बेहिशोबी रोकड मिळून आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भदाणे, राजू निकाळजे यांनी म्हारळ जवळ जुन्नर पुणे येथून येणारे राहुल आहुजा यांच्या वाहनात 4 लाख 10 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड हस्तगत केली आहे. आहुजा हे व्यापारी आहेत. ते विठ्ठलवाडी येथे माल खरेदी करण्यासाठी आलो होतो असे ते सांगत आहेत. मात्र तिन्ही व्यापाऱ्यांकडे बँकेचे स्टेटमेंट नसून त्यांचे उत्तर असमाधानकारक आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उल्हासनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे, मध्यवर्तीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर करत आहेत. दरम्यान अवघ्या 17 तासात आचारसंहिता पथकाने तिघांकडून बेहिशोबी रोकड ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 lakh unaccounted cash seized by Code of Conduct officer