Loksabha 2019 :  मतदानादरम्यान  74 मुंबईकर आजारी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 April 2019

 उकाडा असह्य झाल्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर 74 मतदार सोमवारी आजारी पडले. त्यापैकी 20 जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या सर्वांवर आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. 

मुंबई - उकाडा असह्य झाल्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर 74 मतदार सोमवारी आजारी पडले. त्यापैकी 20 जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या सर्वांवर आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. 

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 40 रुग्णवाहिकांची व्यवस्था आरोग्य विभागाने केली होती. या रुग्णवाहिकांमध्ये 50 मतदारांवर तातडीने उपचार करण्यात आले. वाढलेल्या उकाड्यामुळे त्यांना डोकेदुखी, अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. दोन मतदारांना भोवळ आल्यामुळे आणि तीन मतदारांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयांत दाखल करण्यात आले. पाच जणांना रक्तदाबाचा त्रास झाला, पडल्यामुळे एका मतदाराच्या पायाला फ्रॅक्‍चर झाले. या सर्वांना तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयांत दाखल करण्यात आले. 

कुर्ला पश्‍चिमेकडील सेंट ज्यूड स्कूलमधील मतदान केंद्रात बाबासाहेब शिंदे यांना भोवळ आली. त्यांच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. भोवळ आल्यामुळे आणखी तीन जणांना या रुग्णालयात नेण्यात आले. दक्षिण मुंबईतही प्रकृती बिघडल्यामुळे दोन मतदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्‍चिम उपनगरातील 11 मतदारांना रुग्णालयांत दाखल करावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 74 Mumbaikars ill during voting