Loksabha 2019: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

- मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची मागणी
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे निवडणूक आयोगाला निवेदन
- निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती

मुंबई: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले असून लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्रे ठेवलेल्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये ‘जॅमर’ बसविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. आज(ता.06) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची भेट घेतली. त्यांना दिलेल्या निवेदनात अनेक महत्वपूर्ण मुद्यांकडे काँग्रेसने आयोगाचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात माहिती देताना खा. चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर समाजातील अनेक घटकांनी प्रामुख्याने काही तज्ज्ञांनी वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून स्ट्राँगरूममधील मतदान यंत्रांशी छेडछाड होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे घडले तर तो लोकशाहीसाठी एक गंभीर धोका असेल. हा धोका टाळून निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता कायम रहावी, यादृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. 

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यातील सर्व स्ट्राँगरूममध्ये तातडीने जॅमर बसविण्याची मागणी केली. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना देखील हे जॅमर कार्यान्वीत असले पाहिजे, अशीही अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतरही अनेक महत्वपूर्ण मुद्यांकडे काँग्रेस शिष्टमंडळाने आयोगाचे लक्ष वेधले. 

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीनंतर संबंधित फेरीचा निकाल जाहीर केला जावा आणि त्यानंतरच पुढील फेरीची मतमोजणी सुरू केली जावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही मतदान यंत्रांच्या निकालाची व्हीव्हीपॅटशी पडताळणी केली जाणार आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करताना संबंधीत मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रावरील असावीत, हे निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना देण्यात यावे, अशी मागणी करतानाच एकूण मतदान यंत्रांपैकी 50 टक्के मतदान यंत्रांची व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी केली जावी, या आपल्या जुन्या मागणीचा काँग्रेस पक्षाने पूनरूच्चार केला आहे. 

एखाद्या मतदान यंत्रावर संशय असल्यास संबंधित यंत्राची चार वेळा मतमोजणी करण्याची मुभा देण्यात यावी, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे. 
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात माजी मंत्री आ. नसीम खान, आ. भाई जगताप, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, अभिजीत सपकाळ, डॉ. रामकिशन ओझा, डॉ. गजानन देसाई आदींचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress demand to set Jammer in voting machines Strong Room