Loksabha 2019 : निवडणूक आचारसंहितेचा विद्यार्थ्यांना फटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 उपयुक्त वस्तू वितरित केल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे या वस्तूंचे वाटप रखडण्याची दाट शक्‍यता आहे. 
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर वर्षी 27 उपयुक्त वस्तूंचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी या वस्तू विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असले तरी दोन वर्षांपासून त्याला विलंब होत आहे. या शिक्षणोपयोगी वस्तूंचा दर्जा निकृष्ट असल्याचे आरोपही होत आहेत. त्यावरून शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला अनेकदा लक्ष्य केले. यंदा विद्यार्थ्यांना वस्तू देण्याऐवजी त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे.
 
विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी 36 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीला दिला आहे. पदपथावर किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅंक खाते उघडण्यासाठी आवश्‍यक 100 रुपये भरणे तसेच कागदपत्रांची व्यवस्था कठीण असते. त्यामुळे पैसे नको; वस्तूच द्याव्यात, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेने मांडली आहे. विद्यार्थ्यांना दिलेले पैसे पालकांकडून खर्च होण्याची शक्‍यता असते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शालेय विद्यार्थ्यांना पैशांऐवजी वस्तू मिळणार, हे जवळपास निश्‍चत झाले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या 26 वस्तू मिळाव्यात, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे; परंतु लोकसभा निवडणूक आचारसंहिता अमलात असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वस्तू मिळणे कठीण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay to get school material for students in Election Code of Conduct