esakal | Loksabha 2019 : उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी प्रचारयुद्धातील आज शेवटचा रविवार 
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी प्रचारयुद्धातील आज शेवटचा रविवार 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील शेवटचा रविवार असल्याने आज मुंबईतील रस्त्यारस्त्यावर प्रचाराचा धडाका उडेल.

Loksabha 2019 : उमेदवार, कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी प्रचारयुद्धातील आज शेवटचा रविवार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील शेवटचा रविवार असल्याने आज मुंबईतील रस्त्यारस्त्यावर प्रचाराचा धडाका उडेल. अखेरच्या टप्प्यात उमेदवार सर्व शक्ती एकवटून प्रचार करणार असून, त्याचे प्रत्यंतर रविवारी मिळेल.

लोकसभा निवडणुकीचे मतदान पुढील सोमवारी (ता. 29) असल्यामुळे प्रचार पुढील शनिवारीच (ता. 27) संपुष्टात येईल. त्यामुळे 21 एप्रिल हा निवडणुकीच्या प्रचारातील अखेरचा रविवार असल्यामुळे सर्व उमेदवार पायाला भिंगरी बांधून जोरदार शक्तिप्रदर्शन करतील. मुंबईत भाजप-शिवसेना युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. रविवारच्या प्रचारात त्याचे पडसाद उमटतील. उमेदवारांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
 
सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे रविवारी उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. शक्तिप्रदर्शनासाठी मिरवणुका काढल्या जातील. सकाळी चौकसभा आणि सायंकाळी बैठका, असा शिरस्ता सुरू राहील. उमेदवारांना प्रचारासाठी झोपडपट्ट्या आणि घरगल्ल्यांत जाणे कठीण होत आहे. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत असा प्रचार सुरू आहे. चौकसभांच्या माध्यमातून पक्षांची भूमिका मांडली जात आहे. स्थानिक मुद्द्यांवर उमेदवार नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय पक्षांचे बडे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते रविवारच्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची दाट शक्‍यता आहे. 

स्थानिक प्रश्‍नाची धास्ती 
उमेदवारांना स्थानिक प्रश्‍नांची धास्ती वाटत आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या मालवणीतील नागरिकांनी घेरले होते. बीडीडी चाळीतील रहिवाशांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांना वेढा घालून "पुनर्विकासाचे काय', असा सवाल केला. त्यामुळे स्थानिक प्रश्‍न उमेदवारांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे दिसत आहे.

loading image