Loksabha 2019 : वर्चस्वाची काँग्रेसला संधी!

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

मतदारसंघातील प्रश्‍न

  • प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी 
  • शिवस्मारक, सागरी मार्गाला मच्छीमारांचा विरोध
  • कुलाबा कोळीवाड्यातील मच्छीमारांचे पुनर्वसन
  • क्‍लस्टर योजना रखडल्याने नागरिकांत नाराजी
  • ‘म्हाडा’च्या वसाहतींचे प्रलंबित पुनर्वसन

१९९६, १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता इतर लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकलाय. हे परंपरागत वर्चस्व पुन्हा मिळविणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. 

काँग्रेसचे मुरली देवरा यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळविला; मात्र १९९६ आणि १९९९ मध्ये भाजपच्या जयवंतीबेन महेता यांनी त्यांचा पराभव करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. २००४ आणि २००९ मध्ये देवरांचे पुत्र मिलिंद यांनी पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेतला. मोदी लाटेत मात्र २०१४ मध्ये त्यांनाही पराभव पाहावा लागला. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती पुन्हा विजयाच्या तयारीत असली, तरी देवरा यांनी आव्हान उभे केले आहे. मतदारसंघातील मलबार हिल, कफ परेडसारख्या उच्चभ्रू वस्तीतील मतदार नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला. तसेच गुजराती आणि मारवाडी मतदार भाजपची जमेची बाजू असल्याचे मानले जाते; मात्र याच मतदारांच्या पाठिंब्यावर देवरा पिता-पुत्र निवडून यायचे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह काही उद्योजकांनी देवरा यांना समर्थन दिल्याने चित्र बदलू शकते. बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार रिंगणात असला, तरी प्रचारात त्यांची कुठेही चर्चा नाही. त्यामुळे देवरा आणि युतीचे अरविंद सावंत यांच्यातच थेट लढत होईल. 

दक्षिण मुंबई मतदारसंघात परळ, लालबाग, प्रभादेवी, गिरगावात मराठी मतदारांचे वास्तव्य आहे. ते नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिल्याचा इतिहास आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराजीचे चित्र असल्याने देवरा सावंत यांना जोरदार टक्‍कर देतील, असे वाटते.

मतदारसंघातील भायखळ्यासह नागपाडा, भेंडीबाजार, रे रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल भागांत मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. ही मते ‘कॅश’ करण्यात देवरा यशस्वी ठरले, तर सावंत ‘डेंजर झोन’मध्ये जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress Politics Milind Deora Arvind Sawant