Loksabha 2019 : प्रियांका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 एप्रिल 2019

काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना पुढील वर्षी राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई - काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना पुढील वर्षी राज्यसभेत पाठवण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्या नाराज होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, मात्र काँग्रेसकडून त्यांची निराशा झाली. त्यामुळे काही दिवसापांसून त्या नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात होत्या. काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील त्या काम करत असल्याने आणि मूळ मुंबईतील असल्याने त्यांचे संजय राऊत यांच्यासोबत चांगले संबंध होते. प्रियांका यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील मथुरा असून तेथेही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेलाही आपले पंख अन्य राज्यात पसरावयाचे असल्याने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे प्रियांकाच्या माध्यमातून उत्तरेत शिवसेना पोहोचविण्यास मदत होणार आहे. या पार्शवभूमीवर शिवसेनेत त्यांना आणण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा असल्याचे समजते.

प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, असे सूतोवाच उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Priyanka Chaturvedi Rajyasabha Politics