Loksabha 2019 : राष्ट्रवादाच्या कोंदणात अडकला प्रचार!

संजय मिस्कीन
गुरुवार, 28 मार्च 2019

  •  भारत-पाकच्या भोवती प्रचारांचे रिंगण 
  •  नोटबंदी, बेरोजगारी चर्चेत नाही 
  •  शेतकरी आत्महत्या व हमीभाव गायब 
  •  ताज्या कामगिरीवरच सरकारचा भर 
  •  दुष्काळी उपाययोजनाही कागदावर

मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती फिरत राहील याची काळजी घेत अनंत अडचणींना सामोरे जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या हिताचे मूलभूत प्रश्‍न प्रचाराच्या कक्षेबाहेर राहतील यावरच भर दिल्याचे दिसून येत आहे; मात्र यामुळे सामान्य जनता नाराज असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्‍यता राजकीय तज्ज्ञ व्यक्‍त करत आहेत. 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याअगोदर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण माहोलच बदलून गेला. शेतकऱ्यांच्या व्यथा व आत्महत्या, शेतमालाचा हमीभाव, दुष्काळी उपाययोजना व बेरोजगारी या प्रमुख समस्यांना तूर्तास तरी प्रचारात स्थान मिळताना दिसून येत नाही. विरोधी पक्षाने यावर आधारित प्रचाराची रणनीती आखलेली असली तरी विरोधकांना राष्ट्रवादाच्या भोवऱ्यात गुंतवण्याची रणनीती सत्ताधारी पक्षाने आखल्याचे चित्र आहे.

मूळ प्रश्‍नांना बगल
महाराष्ट्रात नुकतीच भाजप-शिवसेना युतीची पहिलीच महासभा कोल्हापूरला पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत या मूळ प्रश्‍नांवर फारसे बोलणे टाळले. हिंदुत्व, राम मंदिर, विरोधकांवर टीकास्त्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांचा समाचार यासह मागील सरकारच्या कारभाराचे पाढे वाचण्यात या वेळी धन्यता मानण्यात आली.  सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक व आता आंतराळातला (स्पेस) स्ट्राईक यावर सत्ताधारी नेत्यांचा जोर आहे.

नेत्‍यांमुळे कार्यकर्ते संभ्रमात
शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, नोटबंदी व जीएसटी यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर प्रचंड टोलेबाजी केली; मात्र कोल्हापूरच्या सभेत ठाकरे यांच्या भाषणातून हे सर्व मुद्दे गायबच झाले होते. उद्धव ठाकरे यांनी १७ मिनिटांच्या भाषणात स्वागतावर दोन मिनिटे, तर रंगपंचमी-भगवा (१), सर्जिकल स्ट्राईक (१), हिंदुत्व (३), राष्ट्रवादी काँग्रेस (३), राम मंदिर (१), विकास (४) व स्थानिक उमेदवारांवर दोन मिनिटे असे भाषण केले. त्यांच्या या भाषणातल्या प्राधान्यक्रमामुळे शिवसेना कार्यकर्तेही संभ्रमित झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनीही २२ मिनिटांच्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकवर चार मिनिटे तर विकास (४), साखर कारखानदारी (२), राज ठाकरे (१), खासदार राजू शेट्टी (१), कोल्हापूर संस्कृती (२), विरोधक (३), हिंदुत्व (२) आणि स्थानिक उमेदवारावर स्वागतासाठी दोन मिनिटे असे भाषण सजवले. यामुळे आगामी प्रचाराच्या तोफा या केवळ प्रखर राष्ट्रवादाच्या जोरावरच धडाडतील, असाच संदेश दिल्याचे मानले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Publicity Politics BJP Modi Government