मुंबई-ठाणे - मुंबईचा भरवसा युतीवरच!

Mumbai-Thane
Mumbai-Thane

भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी दैनंदिन जीवनव्यवहार असणाऱ्या ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर अशा दहाही लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेना युतीने ताकद सिद्ध केली आहे. यात मुंबईत असणारा शिवसेनेचा हक्काचा मराठी टक्का आणि भाजपची ताकद असलेला इतर भाषिक मतांच्या बेरजेचा परिणाम या विजयोत्सवाचा शिल्पकार ठरला.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी वगळता इतर दोनही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. ठाण्याचे पालकमंत्री म्हणून गड अबाधित ठेवणे एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे मोठे आव्हान होते. त्यातही कल्याण मतदारसंघात त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पालघर मतदारसंघाची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. ठाणे, कल्याण आणि मित्रपक्षाकडील भिवंडीवरही वर्चस्व कमावून शिंदे यांनी पक्षात आपले राजकीय वजन वाढविले आहे. त्याचा परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत राज्यात सत्तेत वाटेकरी असतानाही भाजपवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मित्रत्वाचे नाते विणले. त्यामुळे साडेचार वर्षांत पालघरची लोकसभा पोटनिवडणूक असो किंवा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीची महापालिका निवडणूक असो, वेगवेगळ्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधून आरोप-प्रत्यारोप केले.

मात्र, लोकसभेसाठी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला प्रतिस्पर्धी म्हणून हल्ला करणे भाजपच्या तुलनेत शिवसेनेला जड गेले होते. हीच संधी साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात सभा घेऊन देशभर प्रसिद्धी मिळविली. भाजपला सोडून इतर कुणालाही मतदान करा, असा प्रचार करणाऱ्या राज यांच्या कार्यकर्त्यांची मते नक्की कुणाकडे गेले, हे शोधण्याची वेळ आली आहे.

एकीकडे राज भाजपच्या विरोधात सभा घेऊन आघाडीसाठी वातावरण तयार करीत होते. त्याची चर्चाही सगळीकडे झाली; त्याचवेळी आघाडीकडे विक्रमी सभा गाजविणारे नेतृत्वच या मतदारसंघात नसल्याने त्याचा मोठा फटका आघाडीला बसल्याचे विश्‍लेषकांना वाटते. मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम, दलित आणि बहुजनांची मते, जी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाऊ शकली असती, ती काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडीने स्वत:कडे खेचण्यात यश मिळविले. त्यामुळे वेगवेगळ्या अडथळ्यांचा सामना करीत या दहाही मतदारसंघांतील आघाडीच्या उमेदवारांचे विजयासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, असेच म्हणावे लागेल. त्यातही मिलिंद देवरा आणि ऊर्मिला मातोंडकर यांनी आपापल्या मतदारसंघात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण बनविण्यासाठी शर्थ केली. पण, ते विजयापर्यंत पोचू शकले नाहीत.

आघाडीचा असा कोंडमारा असताना मुंबई-ठाण्याने युतीवरच आपला भरवसा कायम असल्याचे निकालातून दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com