Election Results : शिवसेनेची ताकद ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

गिते यांच्याविरुद्ध नाराजी
रायगडमध्ये गिते यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून नाराजी आहे. ती दूर करण्यात शिवसेनेला यश आले नाही. त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी बाजी मारली. अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा यांनी कडवी झुंज देत शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिरावून घेतला आहे.

मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत.

लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने गेल्या निवडणुकीतील जागा कायम राखल्या आहेत. राज्यातील ४८ जागांपैकी ४१ जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने २३, तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, काँग्रेसला एक आणि वंचित बहुजन आघाडीला एक जागा जिंकता आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार निवडून आले होते. यंदाही शिवसेनेचे तेवढेच खासदार निवडून आले आहेत.

विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि औरंगाबादचे गेल्या दोन दशकांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे हे चार दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे हे नेते नाराज असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली आहे. शिवसेनेने शिरूर, अमरावती, रायगड आणि औरंगाबाद हे मतदारसंघ गमावले आहेत; तर हातकणंगले, कोल्हापूर, पालघर आणि हिंगोली या चार जागा जिंकल्या आहेत.

औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलिल यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव केला. औरंगाबादसह शिवसेनेने शिरूरही गमावले आहे. शिरूरमध्ये शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Shivsena Power Politics