Loksabha 2019 : मनसेने आयोजित केला अनोखा लग्नसोहळा

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

मनसेच्या गजानन काळे यांनी भाजप-सेनेला कोपरखळी मारत गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्पकतेने मागण्या मांडण्याचा आणि प्रचाराचा नवा पांयडा पाडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात नवी मुबंई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. यावेळी गजानन काळे यांनी भाजप-सेनेला कोपरखळी मारत गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

मनसेचं आंदोलन म्हटले की, काहीतरी गोंधळ होणार, अशी चर्चा होत असते; परंतु आंदोलन कोणत्याही गोंधळाशिवाय अगदी शांततेत आणि लक्षवेधी करता येते, हे कल्पक आंदोलनातून मनसेने दाखवून दिले आहे. त्यामुळे कल्पक आंदोलनेदेखील ‘मनसे स्टाईल’ म्हणून नावारूपाला येत आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई आयोजित चि. चौकीदार व चि. सौ. का. थापाबाई ह्यांचा गाजर विवाह सोहळा खोटया आश्वासन कृपेने 29 एप्रिल रोजी 56 इंचाच्या मुहूर्तावर होणार असून जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील, असा आशय गजानन काळे यांनी ट्विट करताना टाकला आहे. मग मंडळी येताय ना आगळ्यावेगळ्या गाजर विवाहास? असेही त्यांनी विचारले आहे.

गाजर विवाह सोहळ कशासाठी ?
भाजप-सेना सरकारने खोट्या घोषणा, खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. भाजप सरकार हे शेतकरी, आदिवासी व गोरगरिबांच्या विरोधातील आहे. म्हणून नवी मुंबई मनसैनिकांनी भाजप सेनेला कोपरखळी काढण्यासाठी गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे गजाजन काळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS organised a unique marriage at Navi Mumbai