Loksabha 2019 : निवडणुकीच्या तोंडावर डिजीटल प्रचाराला खीळ

अमित गवळे 
रविवार, 21 एप्रिल 2019

खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या कामांची व प्रचाराची माहिती, व्हिडीओ आणि फोटो लवकर अपलोड व प्रसारित होत नसल्याने कार्यकर्ते बेजार झाले आहेत.

पाली : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. यामुळे प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बहुतांश मबाईल कंपन्यांचे नेटवर्क धिम्यागतीने चालत असल्याने डिजिटल प्रचाराला खिळ बसली आहे. खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या कामांची व प्रचाराची माहिती, व्हिडीओ आणि फोटो लवकर अपलोड व प्रसारित होत नसल्याने कार्यकर्ते बेजार झाले आहेत.
 
आधुनिकतेच्या व डिजिटलायझेशनच्या जमान्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार देखील डिजिटल झाला आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या आपल्या उमेदवारांच्या कामाची, बैठकांचे माहिती व प्रचार सभांचे वृत्तांत, फोटो, व्हिडीओ कार्यकर्ते सोशल मीडियावर नियमित अपलोड करतात. मात्र जिल्ह्यात सध्या इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या आयडिया, व्होडाफोन, जिओ व बीएसएनएल सारख्या महत्वाच्या कंपन्यांचे नेटवर्क संथ गतीने चालत आहे. आणि याचा प्रतिकूल परिणाम डिजिटल प्रचारावर होत आहे. मागील काही दिवसांपासून तर जिल्ह्यात सर्वत्र इंटरनेट सुविधा कोलमडली आहे. बीएसएनएल या सरकारी सेवेची तर जिल्ह्यात पुर्ण वाट लागली आहे. अशावेळी लोकसभा प्रचार व प्रसाराला अडचणी येत आहेत. त्यामुळे डिजिटल प्रचार करणारे कार्यकर्ते देखील बेजार झाले असून ते या कंपन्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत. नक्की कोणते नेटवर्क वापरावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. 

एकाचवेळी अनेक वापरकर्त्यांचा (युजर्स) भार
या संदर्भात आयडियाच्या व जिओच्या तज्ञांनी 'सकाळ'ला सांगितले की एकाच वेळी अनेक वापरकर्ते (युजर्स) इंटरनेट सेवा वापरत असल्याने या सेवेवर  ताण येतो. परिणामी आपोआप इंटरनेट सेवा संथगतीने चालते किंवा कोलमडते.
 
डोंगरदऱ्या आणि टॉवर ची संख्या कमी 
परिसर डोंगर दऱ्यांनी व जंगलाने वेढलेला असल्याने जिल्ह्यात नेहमीच नेटवर्कची अडचण येते. तसेच अशा भौगोलिक परिस्थितीत मोबाईल टॉवर उभारणे देखील अडचणीचे होते. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या टॉवरच्या संख्या कमी आहे. परिणामी आपोआप सर्वत्र इंटरनेटची समस्या उद्भवते.

निवडणुकीच्या तोंडावर इंटरनेट सेवा संथगतीने चालल्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि ट्विटरसारख्या माध्यमातून आवश्यक माहिती कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत लवकर पोहचत नाही. बऱ्याचवेळा प्रचाराचे महत्वाचे फोटो व व्हिडीओ अपलोड होत नाहीत. माहिती वेळेत पोहचत नाही त्यामुळे गैरसोय होते.
- ओजस सोनकर, डिजिटल प्रचारक व कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस
 
नेटवर्क वारंवार खंडित झाल्याने डिजिटल प्रचाराला अडचणी निर्माण होतात. प्रचाराची कोणतीच माहिती वेळेत पाठविता येत नाही. डिजिटल माहितीची आदानप्रदान करतांना खूप गैरसोय होते.  
- संजोग शेठ, डिजिटल प्रचारक व कार्यकर्ता, शेतकरी कामगार पक्ष
 

नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणूकीत सोशल मिडीया व डीजीटल माध्यमांचा वापर करून प्रचार केला. यंदा देखील डिजिटल प्रचारावरच भर आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात लोकसभेचा प्रचार करणे शक्य नाही. अशा वेळी सोशल मिडीयाचा वापर करून आम्ही प्रचार करत आहोत. मात्र बीएसएनएल बरोबरच सर्वच मोबाईल कंपण्याचे नेटवर्क अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. अशा वेळी मतदारांपर्यंत पोहचणे अवघड होत आहे. त्यामुळेच येणारे सरकार डीजीटल क्रांती घडवून आणणार सरकार असाव व गावागावात नेटवर्क उपलब्ध करून देणार सरकार असाव अशी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.  
 - निलेश शिर्के, भाजप सोशलमिडिया प्रमुख, रायगड

मोबाईल मधील वापरत असलेले ब्राऊझरचे स्टोअरेज फुल असल्यामुळे नेटवर्क कमी येऊ शकते. तसेच वापरकर्ते (युजर्स) वाढतात, टॉवरची मागणी असते, टॉवरमध्ये काही अपडेशन असतात अशा काही कारणामुळे नेटवर्क समस्या उद्भवतात. काही काळात या समस्या दूर केल्या जातील.  
 - किशन, आयडिया कस्टमर केअर सर्व्हिस

नेटवर्क कव्हरेज चांगले आहे. मात्र एकाच वेळी अधिक प्रमाणात नेटवर्क वापरकर्ते असल्याने इंटरनेटची समस्या निर्माण होते. आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होत आहे नेटवर्क कनेक्शन सर्व्हिस चांगली बनविण्यासाठी. 
- सुनील, जिओ, कस्टमर केअर सर्व्हिस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party workers faced Network issue in Raigad District