Loksabha 2019 : सुवेंद्र गांधी यांचे बंड थंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आज पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक व लोकसभा प्रभारी प्रदीप केसकर यांच्या शिष्टाईमुळे त्यांनी उमेदवारीचा निर्णय मागे घेतला.

नगर - नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आज पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक व लोकसभा प्रभारी प्रदीप केसकर यांच्या शिष्टाईमुळे त्यांनी उमेदवारीचा निर्णय मागे घेतला. पक्षाचे काम निष्ठेने करण्याची घोषणा त्यांनी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेत सहभाग घेऊन, भविष्यात गांधी यांना कुठेही डावलण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिल्याचे सांगितले जाते. 

भाजपतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर खासदार गांधी यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले होते. खासदार गांधी यांनी, पक्षाचेच काम करणार असल्याचे समर्थकांच्या मेळाव्यात घोषित केले; मात्र याच मेळाव्यात त्यांचे पुत्र सुवेंद्र यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली होती. भाजपमध्ये पक्षीय पातळीवर हालचाली झाल्यानंतर खासदार गांधी व सुवेंद्र यांची समजूत घालण्यासाठी पुराणिक व केसकर, आज सायंकाळी गांधी यांच्या निवासस्थानी गेले. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार गांधी व सुवेंद्र यांच्याशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. नंतर पक्षाच्या ठरावीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरा सुवेंद्र यांनी पक्षाचेच काम करणार असल्याची घोषणा केली. 

भारतीय जनता पक्षाचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी बंडखोरी करणार नसल्याचा शब्द माझे वडील खासदार दिलीप गांधी यांनीच पक्षश्रेष्ठींना दिला होता. त्यामुळे वडिलांच्या शब्दाखातर मी थांबण्याचा आणि यापुढेही पक्षाचेच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सुवेंद्र गांधी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Back to the decision of Suvendra Gandhi candidature