Election Results : उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो - संजय मंडलिक

सुधाकर काशीद
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

कोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले, ""या निवडणुकीत मनी मसलं आणि पॉवरचा धनंजय महाडिक यांनी वापर केला. पण माझ्यामागे सर्वसामान्य मतदार ठामपणे उभे आहेत. याची मला खात्री होती. आणि मतदारांनी मला कोणत्याही प्रलोभनाशिवाय मते देऊन एक नवा इतिहास घडवला. 

मंडलिक म्हणाले, ""प्रचारात मी ठिकठिकाणी फिरत असताना सर्वसामान्य मतदारांनी मला मोठा विश्‍वास दिला. अनेक ठिकाणी मतदार माझ्याशी खुलेपणाने बोलायला घाबरत गेले. कारण त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचे दडपण होते; पण मला लोकांच्या मनातील भावना कळत होत्या. आणि त्या आधारावरच मी प्रचारात प्रत्येक गावात पोचलो. तेथील लोकांचा विश्‍वास प्राप्त करू शकलो.'' 

ते म्हणाले, ""या निवडणुकीत धनंजय महाडिक व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. मी कितीला झोपतो, कितीला उठतो असल्या चर्चेपर्यंत काहीजण पोचले; पण मतदारांनी अशा टीका करणाऱ्यांना कायमचे झोपविले. तीन वेळा "संसदरत्न' या मुद्यावर प्रचार केला गेला; पण संसदरत्नाबद्दल मीच प्रथम आवाज उठविला होता. या निवडणुकीत मतदारांनी संसदरत्न किंवा अन्य मुद्यांवर अजिबात विश्‍वास ठेवला नाही. महाडिक नको, या भावनेने केवळ मतदारच नव्हे तर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्या बाजूने राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.'' 

सतेज पाटील यांनी केवळ "आमचं ठरलंय' असे न म्हणता त्यांनी जे ठरवलं ते करून दाखवलं, अशा शब्दात मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ""शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी झटले. याशिवाय, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मला जरूर छुपी मदत केली. त्या सर्वांच्या पाठबळातूनच माझा विजय झाला आहे. मी त्या सर्वांचा ऋणी आहे. भाजप-शिवसेनेचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, छोटे-मोठे कार्यकर्ते यांनी तर माझ्यासाठी जीवाचे रान केले, याची मला जाणीव आहे.'' 

मी संसदरत्न होणार नाही 
मी प्रश्‍न विचारणारा खासदार आणि संसदरत्न मिळविणारा खासदार कधीच होणार नाही, असे श्री. मंडलिक यांनी ठळकपणे सांगितले. ते म्हणाले, ""मी प्रश्‍नांची सोडवणूक करणारा खासदार असेन. प्रश्‍न विचारणे फार सोपे आहे; पण प्रश्‍नांची सोडवणूक करून घेणे येथेच खरा कस आहे.'' 

गोकुळ मल्टिस्टेटला विरोध 
मला मतदान म्हणजे गोकुळ मल्टिस्टेटविरोधात लोकांनी मतदान केले असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. ते म्हणाले, ""गोकुळ हा काही व्यक्तींच्या वैयक्तिक राजकारणाचा अड्डा झाला. मी गोकुळ मल्टिस्टेटच्या विरोधात नक्की उतरणार आहे.'' 

एवढे लीड मिळणारच होते 
मी पाच-दहा हजार मतांनी निवडून येईन, असे काहीजण म्हणत होते. मला माझा विजय मोठ्या मताधिक्‍याने होणार, याची खात्री होती. कारण धनंजय महाडिक व "राष्ट्रवादी'च्या नेत्यांना अंधारात ठेवले होते. हे कार्यकर्ते वरवर तिकडे; पण मदत मात्र मला नक्की करीत होते, कारण त्यांना उमेदवार मान्य नव्हता, असेही श्री. मंडलिक म्हणाले. 

मी झालो सर्वपक्षीय उमेदवार 
मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार होतो; पण सर्वपक्षीयांची मदत मला होती. मी त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणणार नाही. पण, त्यांना उमेदवार मान्य नसल्याने त्यांनी मला नक्की मदत केली. काही कार्यकर्त्यांनी मला प्रचंड दबावाला विरोध करीत मदत केली. त्या सर्वांची जाणीव मी ठेवणार आहे, असेही ते म्हणाले. 

मिलिंद नार्वेकर यांचा फोन 
शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक निवडून येणार हे जवळजवळ स्पष्ट झाल्यावर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मंडलिक यांना फोन आला. त्यांनी मतदानाच्या आकडेवारीची ताजी माहिती घेतली व संपर्कात राहण्यास सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results Prof. Sanjay Mandli comment