Loksabha2019 गाठायचे नाय बाबा,मला दाखवून द्यायचे आहे - उदयनराजे भाेसले

Loksabha2019 गाठायचे नाय बाबा,मला दाखवून द्यायचे आहे - उदयनराजे भाेसले

सातारा : नरेंद्र पाटलांचे आव्हान मी स्वीकारलं. गाठायचे तर त्यांना कुठेही गाठू शकतो, पण मला त्यांना गाठायचे नाही. मी मनाने राजा आहे. माझे मन मोठे आहे. माझ्यामुळेच चंद्रकांतदादा विधान परिषदेवर निवडुन आले. कुठेही बोलवा मी यायला तयार आहे, असा इशारा राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नरेंद्र पाटील व चंद्रकांत पाटील यांना दिला.

भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुमच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे असे पत्रकारांनी खासदार उदयनराजेंनी छेडले असता ते म्हणाले, लोकशाही असून मनाने मी राजाच आहे. माझे मन मोठे आहे. चंद्रकांतदादा पाटील पदवीधर मधून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी आम्ही त्यांना मतदान केले, म्हणून ते निवडुन आले. तो भाग सोडून द्या. आता त्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला असेल तर त्यावर मला काही ही बोलायचे नाही.

नरेंद्र पाटील यांनी तुम्हांला समोरासमोर यावे असे आव्हान दिले असून प्रचारात त्यांनी शिव्या ही दिल्या आहेत. तुम्ही कशा प्रकारे त्यांना उत्तर देणार असे पत्रकारांनी उदयनराजेंना विचारले. त्यावर ते उदयनराजे म्हणाले, कुठेही बोलवा मी यायला तयार आहे. चर्चेला बोलवायचे की देत नाही म्हणून बोलवायचे, का आणखी कशाकरिता ते पण ठरवा. मिशांचा पिळ, माथाडींना पिळ मग सगळ गिळ.., हे सगळ बघायला मला वेळ नाही. त्यांचे आव्हान मी स्विकारतो. असे तसे नाही संपूर्णतः स्वीकारतो. गाठायचे तर कुठेपण गाठू शकतो. गाठायचे नाय बाबा. मला दाखवून द्यायचे आहे ही लोक.

(कै.) अण्णासाहेब पाटील यांनी असंघटित कामगारांना संघटीत करून जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचा विचार मांडला. त्याला साथ दिली यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब या सर्वांनी. तर त्या संदर्भात यांच्यातर उलट एवढ्या तक्रारी आहेत. कधी मुंबईला येणे जाणे होते. संपूर्ण तपशिल येतो. असो. अन काय भाषा... सज्ज झालो आहोत. हे पाडीन ते पाडीन. मुळात त्यांना मतदारांच्या समोर जायचेच नाही. त्यांच्या डोक्‍यावर निश्‍चितपणे परिणाम झालाय. त्यामुळे त्यांना काय बोलायचे. आता त्यांच्याच प्रचारात आमदार शंभूराज देसाई सहभागी झाले आहेत, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

लोकसभा निवडणुकीसाठी आज निर्धारनामा प्रसिध्द केला आहे. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन आम्ही केले आहे. नियोजित वेळेत सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या पाच वर्षात आम्ही अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली. यापुढे कमी पडणार नाही. तसेच शेती, पाणी, आरोग्य, उद्योग, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम केले जाणार आहे. देशातील 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न झाले नाहीत. आजही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असून त्यांना आज कोणीही विचारात नाही. योजनांसाठी ते हेलपाटे मारून मरतो. शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. पण त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचतो का? जोपर्यंत शेतकऱ्यांची अर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शेतकरी सदन होईल त्यावेळी शेती व्यवसाय सुधारणा होईल. सिंचन योजना यापूर्वीच पूर्ण व्हायला हव्या होत्या.

उच्च शिक्षण व कौशल्य विकासासाठी पाच वर्षात प्रयत्न केले जातील. करिअर डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी केली जाईल. सातारचे रेल्वे स्टेशन सुसज्ज करणार आहेत. कृष्णा नदी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी संकल्पना ठीक असली तरी ती कागदोपत्रीच ठिक आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com