Loksabha 2019 : मतदान केंद्र असे पण असू शकते का ?

राजशेखर चौधरी
गुरुवार, 18 एप्रिल 2019

या सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्ये म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वारावर आणि आता आकर्षक काढलेली रंगोळी, आकर्षक स्वागत कमान, पूर्ण केंद्रापर्यंत रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग आणि दिखावा, केंद्रावर ऊन लागू नये यासाठी सुंदर मंडप उभारण्यात आला आहे.

अक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक १४५ येथे असलेल्या सोयीसुविधा आणि आकर्षक सजावट पाहून खरोखरच मतदान केंद्र पण असे असू शकते का ?  याचा आनंद घेत सखी मतदान केंद्रावरील आल्हाददायकतेने अक्कलकोटकर भारावल्याचे दिसून येत आहे.

या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड, सुनील जाधव, दत्तात्रय गायकवाड, संजय राऊत, हेरंबराज पथक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या कल्पकतेतून सदर सखी मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. याचा आनंद घेत आणि कौतुक करीत मतदार उल्हासित वातावरणात मतदान करून परत जात आहे.

या सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्ये म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वारावर आणि आता आकर्षक काढलेली रंगोळी, आकर्षक स्वागत कमान, पूर्ण केंद्रापर्यंत रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग आणि दिखावा, केंद्रावर ऊन लागू नये यासाठी सुंदर मंडप उभारण्यात आला आहे. मतदार रांगेत उभे राहू नये यांसाठी सुंदर रंगसंगतीच्या बसण्यास खुर्च्या, पाण्याचा सुंदर कारंजा निर्माण, मतदान करून आल्यानंतर सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईंट, केंद्रातील केंद्राध्यक्ष,इतर कर्मचारी व पोलीस हे सुद्धा सर्व महिला कर्मचारीच आहेत. याशिवाय मतदार केंद्रात प्रवेश केल्यानंतर त्याचे सुंदर गुलाब पुष्प देऊन त्यांच्या हातास सुगंधी अत्तर लावून  स्वागत करण्यात येत आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आता थोड्या वेळाने मतदारांना थंडगार मठ्ठाच्या स्वाद घेता येणार आहे. या सुंदर व्यवस्थापनाचा आनंद घेत मतदान सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 akkalkot election booth Decorate