ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला!

सुधाकर काशीद
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असतील. प्रत्यक्ष निवडणूक गदारोळात पक्ष बाजूला राहून महाडिक की मंडलिक अशा गटबाजीच्या ईर्षेतूनच ही निवडणूक रंगणार आहे.

पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असतील. प्रत्यक्ष निवडणूक गदारोळात पक्ष बाजूला राहून महाडिक की मंडलिक अशा गटबाजीच्या ईर्षेतूनच ही निवडणूक रंगणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला गटबाजी नवी नाही, किंबहुना स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी उघड होती आणि तीच परंपरा पुढेही कायम राहिली. तीच परंपरा अन्य पक्षातही झिरपली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने कोल्हापूर मतदारसंघ महत्त्वाचा आहे. हक्काने उमेदवार निवडून आणणारा मतदारसंघ या दृष्टीने पक्ष नेतृत्वाचे लक्ष आहे. पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेतील कामगिरी नक्कीच दखल घेण्याजोगी आहे. पण दिल्लीत काम करताना त्यांना गल्लीचा विसर पडला, अशी त्यांच्याबद्दल विरोधी पक्षाची नव्हे, तर स्वकीयांचीच भावना आहे. 

खासदार किंवा आमदार झाल्यानंतर नेत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे कसे गरजेचे असते, हा मुद्दा या निवडणुकीत नक्कीच चर्चिला जाईल. कारण आपला नेता आपल्याशी कसा वागतो, किती मान देतो, यावर कार्यकर्ते नेत्याचे मूल्यमापन करतात. 

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा भर शिवसेना कार्यकर्त्यांवर आहेच; पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील महाडिक विरोधकांवर त्यांची भिस्त आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा विरोध जगजाहीर आहे. पक्षाने आदेश दिला तरी ते चित्रात न येताही आपला विरोध सर्वत्र पोचवू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांना मदत करूनही त्यांनी विधानसभा निवडणुकीत चुलत भाऊ भाजपचे अमर महाडिक यांना मदत करून विरोध केल्याचा राग त्यांच्या मनात कायम आहे.

या निवडणुकीत विविध मुद्दे जरी असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत गटातटाची फोडाफोडी, आतून बाहेरून मदत, गाव, संस्था, पेठा, समाज आपल्याकडे वळवून घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर अटळ असेल. त्यातूनच दोन्ही उमेदवार चहापान, जेवणावळीत मांडीला मांडी अशा ‘उपक्रमातून’ फिरू लागले आहेत. भाजप-शिवसेना युती नंतर शिवसेना येथून उमेदवार देते की भाजप जागा मिळवते यावर मतदारसंघातील लढत अवलंबून असेल.

मतदारसंघातील प्रश्‍न
    ऊसदर प्रश्‍न आणि एफआरपीचा तिढा
    कोल्हापूर विमानतळ विकास आणि सुरळीत सेवा
    लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापूर-वैभववाडी लोहमार्ग प्रगती

२०१४ ची मतविभागणी
    धनंजय महाडिक - (राष्ट्रवादी) ६,०७,१८४ (विजयी)
    संजय मंडलिक - (शिवसेना) ५,७१,३६२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress Shivsena NCP Politics