Loksabha 2019 : माढ्यात आज शरद पवारांच्या तीन सभा.

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 April 2019

माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे.​

अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे.

श्री पवार यांच्या आज सायंकाळी ४ वाजता नातेपुते, ६ वाजता दहिवडी आणि ८-१५ वाजता फलटण येथे सभा होणार आहेत. नातेपुते येथील सभा पालखी मैदानावर तर दहिवडी येथील सभा बाजारतळावर होणार आहे. या सभेला श्री पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे, विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२००९ साली आकाराला आलेला माढा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. प्रथम श्री पवार आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी येथे प्रतिनिधीत्व केले आहे. आता मोहिते पाटील परिवारातील तरूण नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील देखील भाजपच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. या ताकदीच्या बळावर भाजपने येथे परिवर्तन घडविण्याचा संकल्प केला आहे.

अकलूज. वाडीकुरोली, फलटण येथील तीन सभाद्वारे मुख्यमंत्र्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, त्यातून वाढलेली पक्षाची ताकद आणि मोहिते पाटलांची मजबूत साथ यामुळे भाजपचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. माढ्यातून श्री पवार यांनी पळ काढल्याची आवई उठवून भाजपने पवारांना सतत हिणवले आहे. त्यातच खासदार मोहिते पाटील यांनी माढ्यासह बारामती आणि शिरूर मतदारसंघात देखील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका आणि मोहिते पाटलांची भुमिका या अनुषंगाने श्री पवार काय बोलतात याची लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

कॉंग्रेसमुक्त भारत म्हणणारा भाजप आता कॉंग्रेसयुक्त झाला आहे. त्यामुळे मुळच्या भाजपवाल्यांची कोंडी झाली आहे. समोर पराभव दिसू लागल्याने महायुतीचे नेते, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी येथे सभा घेतल्या आहेत.

जे मुख्यमंत्री माझ्यामागे चारवेळा उमेदवारीसाठी लागले होते ते, पवारांचा काय पाडाव करणार आहेत. आधी माझ्याशी लढा म्हणाव, पवार साहेबांच्या विरोधातील गोष्ट खूप दूरची आहे. लोकांमध्ये या सरकारविषयी कमालीचा संताप आहे. आता जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे, आता त्यांनी डोनाल्ड ट्रंम्पची सभा घेतली तरी, काही उपयोग होणार नाही.
- संजय शिंदे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Madha Sharad Pawar Speech Politics