Loksabha 2019 : भावनिक साद अन्‌ विकासाचे दावेही!

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 18 एप्रिल 2019

काही आघाडीवर... काही पिछाडीवर!
शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे, चुलत बंधू विक्रमसिंहराजे हे निवडणुकीपासून थोडे लांबच राहिल्याचे दिसतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवाजीराजे व त्यांच्या पत्नी चंद्रलेखाराजे हे दोघेही अदालतवाडा येथूनच मतदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत आहेत. प्रचारात उतरलेल्या नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री वत्सलादेवी या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या विश्रांती घेत आहेत. रमेश पाटील हे उदयनराजेंच्या प्रचारात आहेत.

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या आई राजमाता कल्पनाराजे, पत्नी दमयंतीराजे, चुलते शिवाजीराजे, चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे, तर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी डॉ. प्राची यांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही कुटुंबातील व्यक्ती बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत.

राजमाता कल्पनाराजे
राजमाता कल्पनाराजे यांना मानणारा विशिष्ट वर्ग जिल्ह्यात आहे. उदयनराजेंच्या प्रचारार्थ त्यांनी पाटण तालुक्‍यातील विविध गावांना, वाड्या-वस्त्यांवर भेटी दिल्या. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिथे कुणी पोचत नाही, त्या ठिकाणी उदयनराजे पोचतात. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा विजय ही औपचारिकता असून सर्वांनी कसोशीने प्रयत्न करून उदयनराजेंना विजयी करा, असे आवाहन त्या मतदारांना करतात. त्यांच्याबरोबर साताऱ्याच्या माजी नगराध्यक्षा रंजना रावत असतात. उदयनराजेंच्या बरोबरीने कल्पनाराजेंनीही प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन दोन दिवस आधी उदयनराजेंच्या प्रचार कार्यालयातून होते. 

दमयंतीराजे भोसले
‘नक्षत्र’ या संस्थेच्या माध्यमातून दमयंतीराजेंनी सातारा शहरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शहरातील विविध समाजसेवी कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. राजकारण मला फारसे समजत नाही. राजकीय भाषणबाजी करता येत नाही. तुम्ही आमच्या कुटुंबावर करीत असलेल्या प्रेमाने मी भारावून जाते, असे त्या मतदारांना सांगतात. हिंदीत संवाद साधत आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर त्या सर्वांवर छाप पाडताना दिसतात. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत त्या शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या जोडीला नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेविका स्मिता घोडके व नगरसेवक असतात. शहर प्रचार कार्यालयातून एक दिवस आधी त्यांचा संपर्क दौरा ठरविला जातो. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजेंनी प्रचारात आघाडी  घेतली  आहे.  साताऱ्यासह जावळी तालुक्‍यात गावोगावी जाऊन ते मतदारांच्या संपर्कात आहेत. सातारा शहरात पदयात्रांच्या माध्यमातूनही ते सक्रिय दिसतात. वैयक्तिक गाठीभेटींसह ते उदयनराजेंबरोबरही प्रचारसभांत शाब्दिक टोलेबाजी करतात. त्याचबरोबर राजे घरण्याच्या मनोमिलनाबाबत वस्तुस्थिती सांगताना मतदारांना भावनिक आवाहनही ते करत आहेत.

डॉ. प्राची पाटील
डॉ. प्राची पाटील या सातारा जिल्ह्यासह पुणे, मुंबई येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. गावांसह वाड्या-वस्त्यांवर जात प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे. जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी प्रयत्न केलेत. त्याचे वेगवेगळे दाखले देत डॉ. पाटील या युवा वर्गास तसेच महिलांशी संवाद साधतात. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांचे दीर रमेश यांचा प्रचार केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Politics Udayanraje Bhosale Narendra Patil