Loksabha 2019 : मताधिक्‍य अन्‌ अनपेक्षित विजयाची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

नेत्यांतील अस्वस्थता वाढू लागली 
काहीही झाले तरी बालेकिल्ल्यात उदयनराजेंचा विजय निश्‍चित असला, तरी नरेंद्र पाटील यांच्याविषयी पाटण, कऱ्हाड दक्षिण, सातारा, महाबळेश्‍वर, जावळी, खंडाळा तालुक्‍यांत असलेली सहानुभूती उपयोगी पडणार का? हे ही महत्त्वाचे आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसतशी राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपच्या नेत्यांतील अस्वस्थता वाढू लागली आहे.

सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन टाकलंय हे मात्र, गुलदस्त्यात असल्याने वाढलेल्या उकाड्यात नेते मंडळींची घालमेल होऊ लागली आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध भाजप- शिवसेना युतीचे नरेंद्र पाटील अशी चुरशीची लढत झाली. आता निवडणुकीचा निकाला येत्या गुरुवारी २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूकडून अनेक तर्कवितर्क आणि त्याला साजेशी अशी आकडेमोडही जोडली जात आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला ही उदयनराजेंच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर भाजप- शिवसेनेला नरेंद्र पाटील यांच्या अनपेक्षित विजयाचीही उत्सुकता आहे.

सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचे चार आमदारही आहेत. उर्वरित पैकी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहेत. उदयनराजेंनी पक्षाचा बालेकिल्ला असूनही पहिल्यापासून प्रचारात आघाडी घेतली होती, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना स्वतंत्र यंत्रणा राबवून नरेंद्र पाटील यांचा प्रचार केला. भाजपने मागील निवडणुकीपासूनच सातारा जिल्ह्यात बालेकिल्ला पोखरण्यास सुरवात केली आहे. त्याचा परिणाम त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सात सदस्य निवडून आणता आले. 

त्यासोबतच शिवसेनेनेही चांगली बांधणी केली होती. त्यामुळे त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून आले, तर पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या माध्यमातून त्यांचा हक्काचा आमदार आहे. या सर्व परिस्थित लोकसभेचा निकाल काय असेल याबाबतची आकडेमोड आता सुरू झाली आहे.

मतमोजणीला केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या ‘काऊंटडाऊन’मध्ये उदयनराजेंचे मताधिक्‍य वाढणार, की कमी होणार याची तर नरेंद्र पाटील सर्वांना धक्का देत अनपेक्षितपणे निवडून येणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे. सुरवातीला राष्ट्रवादीचे नेते उदयनराजेंचे मताधिक्‍य दीड ते दोन लाख म्हणत होते, तेच आता ५० ते २५ हजारांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे त्यांनाही मतदारांनी काही ठिकाणी दणका दिल्याचे जाणवू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Countdown Politics NCP Shivsena