Loksabha 2019 : उदयनराजे, पाटलांचा हायटेक प्रचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

‘सोशल पॉवर’वर भर
खासदार उदयनराजे भोसले, अपक्ष उमेदवार शैलेंद्र वीर, बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्यासह इतर उमेदवारांनीही सोशल मीडियाद्वारे प्रचाराची सूत्रे गतिमान केली आहेत. थेट मतदारांपर्यंत जाणे अडचणीचे ठरणार असल्याने सर्वांकडून सोशल मीडियाचा ताकदीनिशी वापर केला जात आहे.

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असल्याने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. विस्तृत मतदारसंघात सर्व मतदारांपर्यंत पोचणे उमेदवारांसाठी अशक्‍य असल्याने सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले, भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी अँड्राइड मोबाईल ॲपचा पर्यायही आजमावला आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर नरेंद्र पाटील यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे उदयनराजेंशी लढत देताना नरेंद्र पाटील यांना कसोशीने प्रयत्न करावे लागत आहेत. उदयनराजेंची स्वत:ची एक इमेज, तसेच तरुण वर्गातील टीआरपी हे त्यांचे बलस्थान आहे. सोशल मीडियावर उदयनराजेंची ‘चलती है’ला भेदण्यासाठी नरेंद्र पाटलांनी सोशल मीडियाचा वापर करण्याबरोबर त्याच्या पुढे जाऊन अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘NarenAp’ असे टाइप केल्यानंतर हे ॲप खुले होते. त्यामध्ये त्यांनी माथाडींचे नेते (कै.) अण्णासाहेब पाटील, स्वत:विषयी, शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याविषयी माहिती दिली आहे. त्या शिवाय पाटील यांचे कार्यक्रम, बातम्या याविषयी माहिती त्यामध्ये समाविष्ठ आहे. मतदारांना आपले नाव यादीत आहे का? कोणत्या बूथवर आहे, हे पाहण्याची सुविधाही या ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. 

उदयनराजेंनीही ‘Udayanraje Bhosale’ नावाचे अँड्रॉइड मोबाईल ॲप विकसित केले असून, त्यात विधानसभा मतदारसंघातील मतदारांची गावनिहाय यादी पाहू शकतो, तसेच मतदार स्वत:चे नावही तपासू शकतो. बूथ कार्यकर्त्यांसाठी हे ॲप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje bhosale Narendra Patil Hitech Publicity Politics