Loksabha 2019 : माणूस हीच माझी जात - उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

भीमाबाई आंबेडकर स्मारक उभारू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांची समाधी साताऱ्यात आहे. संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महामानवाच्या माउलीचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द उदयनराजे भोसले यांनी भाषणात दिला.

सातारा - ‘जातपात मला माहीत नाही आणि मी जातीभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात आहे. ‘वंचित’ या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून व आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत देशात सत्तांतर घडवा,’’ असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील कल्याण रिसॉर्टमध्ये परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीतील विविध दलित संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रभाकर कांबळे, रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, भीमशक्ती संघटनेचे प्रदेश सचिव बाळासाहेब शिरसाट, ज्येष्ठ ‘रिपाइं’ नेते अप्पासाहेब गायकवाड, ‘रिपाइं’ ब्लू फोर्स संघटनेचे दादासाहेब ओव्हाळ, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भिसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, राम हादगे, पालिकेचे माजी उपाध्यक्ष मुरलीधर भोसले, भाऊ दळवी, पंचायत समिती सदस्या अलका बोभाटे, नंदा भिसे आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘शिवरायांची स्वराज्याची संकल्पना आणि बाबासाहेबांनी राज्यघटनेतून मांडलेला समतेचा विचार मोडून-तोडून हुकूमशाही आणण्याचे पाप करणाऱ्या युती सरकारला धडा शिकवा आणि पुरोगामी विचारांची ताकद दाखवून द्या. ज्या क्रांतिभूमीत अनेक चळवळी जन्मास आल्या, त्या जिल्ह्यातील क्रांतिकारी मतदारांची शक्ती मतदानाच्या पवित्र अधिकाराद्वारे दाखवून मुजोर हुकूमशहांना धडा शिकवण्यासाठी भीमसैनिकांसोबत खांद्याला खांदा देऊन पाठीशी उभे राहताना काकणभर अधिक योगदान देण्यात मी कुठेच कमी पडणार नाही.’’

सुनील काटकर यांनी प्रास्ताविक केले. माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण धस्के यांनी सूत्रसंचालन केले. समृद्धी जाधव यांनी आभार मानले. मेळाव्यात किशोर तपासे यांना श्रद्धांजली वाहिली. छत्रपती युवा सेनेचे सातारा तालुकाध्यक्ष शंभूराज नाईक व कोरेगाव शहर कार्याध्यक्ष गौरव खवळे यांना उदयनराजेंच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Speech Politics