Loksabha 2019 : पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत व सुरक्षित वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे पोलिस प्रशासनातर्फे या निवडणुकीसाठी तब्बल अकरा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पुणे - पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत व सुरक्षित वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे पोलिस प्रशासनातर्फे या निवडणुकीसाठी तब्बल अकरा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी अल्पबचत भवन येथे सकाळी सातला मतदान केले. त्यानंतर त्यांनी शहरातील मतदानासाठीच्या बंदोबस्ताची प्रत्यक्षात पाहणी केली. नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पुणे पोलिसांनी मतदान केंद्र व परिसरात बंदोबस्त तैनात केला. शहरातील २५०९ बूथसाठी २४७० पोलिस कर्मचारी, १५४० होमगार्ड, पाच शीघ्र कृती दल, संवेदनशील बूथसाठी विशेष बंदोबस्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरारी पथके असा बंदोबस्त पोलिसांनी ठेवल्याचे मतदान केंद्रांवर दिसून आले. पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रे शिवाजीनगर शासकीय गोदामामधील ‘स्ट्राँगरूम’मध्ये ठेवली असून, त्यास सीआरपीएफ, त्यानंतर एसआरपीएफ आणि शेवटी पुणे पोलिस असे त्रिस्तरीय संरक्षण देण्यात आले आहे.

मागील एक महिन्यापासून पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, शिरीष सरदेशपांडे आणि त्यांच्या टीमने चांगले नियोजन केले होते. त्यामुळे मतदान शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडले. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण आला नाही.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त

पक्षांचे टेबल  मतदान केंद्रांपासून २०० मीटरवर ठेवल्याने किरकोळ वाद उद्‌भवले. परंतु केंद्र प्रमुखांनी तो मिटविला. एकाच ठिकाणी दोन बोगस मतदान झाले.  
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

पिठलं-भाकरी अन्‌ वांगे-चपाती ! 
बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन ते तीन  दिवस चांगले भोजन, नाश्‍ता पुरविण्यात आल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोमवारी रात्री पिठलं भाकरी, मंगळवारी सकाळी नाश्‍त्यासाठी पोहे, दुपारी वांग्याची भाजी व चपाती असा सकस आहार वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune and Baramati Lok Sabha constituency to vote peacefully