मोदी- शहांना राजकीय क्षितिजावरून हटवूया- राज ठाकरे

मोदी- शहांना राजकीय क्षितिजावरून हटवूया- राज ठाकरे

सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा झाली.

ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय, असं मला विचारलं जातं, ह्याचं उत्तर आहे माझे प्रेरणास्थान आपले छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराजांशी लढाई करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्राकडे कूच करायला निघाला, पण दरम्यानचा काळात महाराजांचं निधन झालं होतं. असं असताना सुद्धा औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसला कारण औरंजेबाला 'शिवाजी' हा शब्द-विचार छळत होता. मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्र होता, मग मोदी आणि शहा यांच्याविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल ?

राजा रामदेवराय या आमच्या राजाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की, बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करू शकतात.पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ज्या विषयांवर बोलले होते त्या विषयांवर ते आज बोलायला तयार नाहीत. हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या पाच वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी या देशावर नोटाबंदी लादली. असं काय होतं की या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं नव्हतं? बरं मोदींनी नोटाबंदींनी काय साधलं?

नोटाबंदीने कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. फक्त भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं केले आणि निवडणुका जिंकायला पैसे आले हेच साध्य झालं नोटाबंदीने. चार वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या वेळेला मी बोललो होतो की नरेंद्र मोदी हे निवडणूक जिंकण्यासाठी युद्धसदृश परिस्थिती निर्माण करतील आणि तसंच झालं.

आज सैन्यातील जवान अत्यंत कठीण परिस्थितीत देशांच्या सीमांचं रक्षण करत असतात आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हुतात्मा जवानांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतात. लाज नाही वाटत पंतप्रधानांना?

पंतप्रधान होण्याआधी मोदी, तेव्हाच्या पंतप्रधानांना विचारायचे तुमच्या हातात सगळी सत्ता आहे मग तरीही सीमांच्या आडून शस्त्र, अतिरेकी येतात कुठून आणि कसं? मग मला सांगा नरेंद्र मोदी तुमच्या हातात पूर्ण सत्ता होती ना मग पुलवामा हल्ला झालाच कसा ? या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कधी देणार? सत्तेत आल्यावर जेवढे सैनिक हुतात्मा झालेत तेवढे सैनिक याच्या आधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ असं सत्तेत येणाच्या आधी म्हणणारे मोदी, स्वतःच्या शपथविधीला नवाझ शरीफ यांना बोलवतात, त्यांना केक भरवतात. मला सांगा हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना काय वाटलं असेल?

आपले सैनिक काश्‍मीरमध्ये चेकपोस्टवरती प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य बजावत असताना, कोणीतरी , चेकपोस्ट तोडून घुसणाऱ्याला नाईलाजाने गोळी मारली. पुढे काश्‍मीर पेटलं आणि अशा वेळेला सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या.

जर सैनिकांवर अशा प्रकारे कारवाई होणार असेल तर जवानांच्या मनोधैर्याचं काय झालं असेल याचा विचार करा? आणि पुढे त्या काश्‍मीरमध्ये जवानांवर लोकांनी हल्ले केले आणि जवान का शांत बसले कारण त्यांना माहित आहे की आमचं सरकार आमच्या पाठीशी ठाम उभं राहणार नाही. भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबियांबद्दल गैरउदगार काढतो तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो. आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही जवानांबद्दलची आस्था पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान का सांगतोय की नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजेत. असं का? आजपर्यंत हे कधी घडलं नाही? काय शिजतंय नक्की? 15 एप्रिलला राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले, की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर हुतात्मा जवान का होऊ शकत नाही? यावरून आता असं वाटतंय की पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? आपले 40 जवान हकनाक मारले गेले. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हकनाक मारले गेल्यावर खरं तर पंतप्रधानांना दुःख असायला हवं की नाही ? पण टेलिग्राफ नावाच्या वर्तमानपत्राने फोटो छापलेत ज्यात मोदी डिझायनर कपड्यात हसत फिरत होते. आणि एवढं घडलेलं असताना कोरियामध्ये ऍवॉर्ड घ्यायला गेले. नोटाबंदीनंतर देखील मोदी निर्लज्जासारखे पुरस्कार स्वीकारायला जपानला निघून गेले जेंव्हा देशात लोकं रांगेत उभे राहत होते, शेकडो माणसांचे जीव गेले. हुतात्मा जवानांच्या जीवावर लोकांकडे मोदी मागत आहेत, एअरस्ट्राईक करणाऱ्या पायलट्‌सच्या जीवावर मतं मागत आहेत पण पाच वर्षांपूर्वी जे बोलले त्यावर काही बोलत नाहीत. म्हणून सांगतो मोदी आणि शाह यांना राजकीय क्षितिजावरून हटवूयाच पण त्यांना मदत होईल अशा कोणालाही मतदान करू नका. या सभेस मोठ्या सातारकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com