Loksabha 2019 : गटातटाच्या बंडाळीत बुडलाय माढा!

संजय मिस्कीन
सोमवार, 22 एप्रिल 2019

लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात.

लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात.

सोयरिकी जुळवण्यात माहीर असलेला एक चाळीसवर्षीय युवक प्रफुल्ल पाटील जामगावकर सांगत होता. सांगली लोकसभा मतदारसंघातून दिघंची येथून माढा लोकसभा सुरू होतो. माढा तर राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचा तालुका. साखर कारखानदारीनं बहरलेला भाग. सांगोला, माण व खटाव हे दुष्काळी विधानसभा मतदारसंघ. त्यामुळे पाण्यावरचे या वेळचे राजकारण बेतल्याचा प्रचार जोरात. कृष्णा-भीमा स्तरीकरणाचा मुद्दा प्रचाराचा केद्रबिंदू झाला तरी सगळं राजकारण शेवटी सगेसोयरे व नात्यागोत्यावरच जाणार असं प्रफुल्ल पाटील सांगत होते. कुर्डूवाडीत त्यांना भेटलो. प्रफुल्ल पाटील हे एक अजब व्यक्तिमत्त्व. एमपी.एड पदवीधारक.

पण लग्नाच्या सोयरिक जुळवण्यात नाव कमावलयं. कोणाचंही नावं घेतलं तर हा पठ्ठ्या संपूर्ण पाच सहा तालुक्‍यातली संबंधितांची नातीगोती सांगतो.

त्या घराण्यांची राजकीय नाती, राजकीय भूमिका काय राहील, याचा अंदाज तत्काळ सांगतात. आतापर्यंत सातशेहून अधिक सोयरीक जुळवल्या आहेत त्यांनी. सामान्य शेतकऱ्याकडे लग्न खर्चाचा भार पडू नये, म्हणून साखरपुड्यातच लग्न उरकून खर्च टाळण्याचा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या मते पाण्याच्या विषयावर राजकारण बेतलेलं असलं तरी, गटतटाचा बोलबाला राहणार. 

सर्वांत जास्त राजकीय बंडाळी 
भाजपनं काँग्रेसकडून उमेदवार आयात केला अन्‌ प्रचाराची सर्वस्वी धुरा राष्ट्रवादीतून आयात केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांवर दिली. मूळ भाजप तसा काहीच नाही. शिवसैनिकांना तर काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आल्याने बरेच जण प्रचारात उतरताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीनं गाजलेल्या या मतदारसंघात प्रचंड अटीतटीची लढाई आहे. सत्ता-चेहरा व समस्या असे सूत्र इथे नाही. देशाच्या समस्या, शेतीचे प्रश्न हे दुय्यमस्थानी... हर्षल बागल सांगत होता.  जातीय समीकरणांवरही राजकीय जय-पराजय ठरण्याची शक्‍यता आहे. बाकी राष्ट्रीय प्रश्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, कर्जमाफीचा बोजवारा, पीककर्जाची अवस्था या बाबी गौण. त्यामुळं राजकीय बेरीज वजाबाकीत जो माहीर, तोच या लोकसभेचा खासदार, हे चित्र 
स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reporter Diary Sanjay Miskin Madha Constituency Politics