Loksabha 2019 : सांगलीत आता उत्सुकता उमेदवारीची

Loksabha 2019 :  सांगलीत आता उत्सुकता उमेदवारीची

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. २३ एप्रिलला मतदान होणार आहे, तरीही सांगली जिल्ह्यात अजूनही राजकीयदृष्ट्या सामसूम आहे. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच उमेदवारी असेल, अर्थात भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाही; पण याउलट काँग्रेसच्या तंबूत सारीच अनिश्‍चितता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या मतदारसंघावर त्यांच्या मित्रपक्षांनीही दावे केले आहेत. अशावेळी काँग्रेस येथे बलाढ्य भाजपविरोधात कोणता तगडा उमेदवार देणार याबाबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यांपैकी चार भाजप-शिवसेनेकडे व दोन काँग्रेस व राष्ट्रवादीकडे आहेत. सध्या तेथे काय स्थिती आहे, यावर हा एक दृष्टिक्षेप...

मिरजः गेल्यावेळी निर्णायक मताधिक्‍य दिले आता?
मिरज विधानसभा मतदारसंघाने गेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून दिले. अर्थातच याचे श्रेय आमदार सुरेश खाडे यांनी घेतले. शहरासह संपूर्ण तालुका भाजपमय करणारे आमदार सुरेश खाडे या लोकसभा निवडणुकीत ही पंरपरा कायम ठेवतात का? असा प्रश्‍न सध्या भाजप परिवारासह सर्वांना पडला आहे.  गेल्या चार वर्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या म्हणावे तेवढे चांगले वातावरण नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समीती आणि महापालिका निवडणुकांमध्ये आमदार खाडे आणि खासदार संजय पाटील यांच्यातील धुसफूस अजूनही कार्यकर्ते विसरलेले नाहीत. मिरज पूर्व भागातही गावागावांत भाजपमध्ये गटबाजी आहे, असे असले तरी काँग्रेसही तालुक्‍यात तशी निद्रिस्तच आहे. त्यामुळे या मतदारसंघात सध्या तरी भाजपचेच पारडे जड आहे.

तासगाव-कवठेमहांकाळः संजय पाटलांचे होमपिच
 तासगाव, कवठेमहांकाळ हे दोन तालुके तथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खासदार संजयकाका पाटील यांचे होमपिच आहे. अर्थात होमपिच दुसरी इनिंग खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मागील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यावेळचे लीड किती? एवढाच विषय सध्या चर्चेत आहे. तासगाव हा मूळचा गड दिवंगत नेते आर. आर. आबांचा आहे. त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या येथे विद्यमान आमदार आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाने संजयकाकांना आपला उमेदवार म्हणून जवळजवळ एकतर्फी मतदान केले होते. गेली निवडणूक काँग्रेसचे प्रतीक पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील अशी न होता, आर. आर. आबा विरुद्ध संजयकाका अशी झाली होती. संजयकाकांना ३८ ते ४० हजारांचे लीड मिळाले होते. अजितराव घोरपडे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय मागील निवडणुकीनंतर घडलेल्या अनेक घटनांचे पडसाद या निवडणुकीवर उमटणार, हेही निश्‍चित आहे.

सांगलीः महापालिकेच्या सत्तेने भाजपचे पारडे वरचढ
सांगली विधानसभा मतदारसंघात आज भाजपचे प्राबल्य दिसून येते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना सांगलीतून मोठे मताधिक्‍य मिळाले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांतही परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे एकत्र येऊनही महापालिका निवडणुकीत भाजपने या आघाडीला धोबीपछाड देत स्वबळावर प्रथमच महापालिकेत सत्ता स्थापन केली. शिवाय सांगली विधानसभा मतदारसंघातील गावांमध्येही भाजपची ताकद निर्माण करण्यात आमदार सुधीर गाडगीळ यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आणि गटबाजी रोखण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश मिळाले, तर पारंपरिक काँग्रेसचा मतदारही येथे अजून टिकून आहे. तसेच जयंत पाटील राष्ट्रवादीची ताकद कशी उभी करतात त्यावरही काँग्रेसचे येथील समीकरण आहे. भाजपचे पारडे जड असले तरी खासदार गट आणि आमदार गट यांच्या दुहीचा फायदा काँग्रेस उठवणार काय, यावर बरेच अवलंबून आहे. काँग्रेसकडून जे लोकसभेच्या मैदानात चर्चेत आहेत यामध्ये विशाल पाटील, प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे तिघेही याच मतदारसंघातून आहेत. त्यामुळे सांगली मतदारसंघात मोठी रस्सीखेच पहायला मिळेल.

कडेगाव-पलूसः काँग्रेसचा एकमेव हुकमी गड 
या दोन तालुक्‍यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण दिवंगत नेते पतंगराव कदम यांचा हा मतदारसंघ आहे. येथे काँग्रेसची मोठी ताकद आहे. दोन्ही नगरपंचायती काँग्रेसकडे आहेत. तरीदेखील मोदी लाटेत येथूनही भाजपने मताधिक्‍य मिळविले होते. अर्थात यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही हा मतदारसंघ आहे. संजय पाटील व त्यांच्यातील वैमनस्य गेली चार वर्षे ताणत चालले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. तेदेखील संजय पाटील यांना कशी मदत करतात, त्यावर येथील भाजपची मदार अवलंबून असेल. विश्‍वजित कदम येथील आमदार आहेत. त्यांनाच लोकसभेला उभे राहण्यासाठी आग्रह होत आहे, पण ते तयार नाहीत, मात्र काँग्रेसचा जो उमेदवार असेल त्यामागे ते ताकद लावणार, असे ते म्हणतात. एकूणच या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जतः भाजपचे प्राबल्य
या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. आमदार विलासराव जगताप व संजयकाका पाटील यांचे सूर सुरवातीपासून चांगले आहेत. भाजपमध्ये येथे गटबाजी असली, तरी सध्या विलासरावांनी काकांशी जुळवून घेतले आहे. अर्थात भाजपमध्ये येथे दोन गट आहेत. येथील नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे, तरीपण भाजपचे येथे नगरसेवक तुल्यबळ आहेत. हा दुष्काळी भाग असून येथे भाजप पाणी देईल, या आशेवर जनता आहे. काँग्रेसचे येथील आक्रमक नेते विक्रम सावंत आहेत, पण त्यांचेही संजयकाकांशी चांगले जमते. अर्थात या तालुक्‍यात अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत काँग्रेस टिकून आहे. राष्ट्रवादीचेही प्राबल्य आहे. गतवेळी संजयकाकांनी येथून मताधिक्‍य घेतले होते. यावेळी ते टिकते की घटते, हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल.

खानापूरः बाबर-काकांचे जमले तरी पडळकरांची अडचण
खानापूर व आटपाडी हे तसे दोन्ही दुष्काळी तालुके, पण टेंभूमुळे सध्या हे तालुके पाणीदार होऊ लागले आहेत. याचे श्रेय घेण्याची चढाओढ शिवसेना-भाजपमध्ये असली तरी सध्या युती झाल्याने अनिल बाबर आणि संजयकाकांचे सूत जमले आहे. गतवेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख श्री. पाटील यांच्यासोबत नव्हते, तरीही ३५ हजारांवर मताधिक्‍य त्यांनी घेतले. यावेळी चित्र वेगळे आहे. आमदार श्री. बाबर यांनी यापूर्वीच लोकसभेला भाजपचे काम करणार, असे जाहीर केलेय. त्यातच भाजप-शिवसेना युती झाल्याने आमदार बाबर यांच्यासमोरील अडचणी दूर झाल्या. आटपाडीचे माजी आमदार श्री. देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला आहे. दोन्ही देशमुख बंधूंचे खासदार पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते त्याच्यासोबतच राहणार यात शंका नाही. काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. खासदार पाटील व माजी आमदार श्री. पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. यावेळी ते पक्षाचा की मैत्रीचा धर्म पाळणार? याकडे लक्ष लागले आहे. गोपीचंद पडळकर यांनी मात्र खासदारांविरोधात मोठे बंड केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com