अन उदयनराजे भाेसलेंचा कार्यकर्त्यांना आदेश

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 26 मे 2019


याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी बोगदा परिसरात कारवाई करत दोघांची सुटका केली. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होत्या.
 

सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघात विजयाप्रित्यर्थ उभारण्यात आलेले शुभेच्छा फलक एका रात्रीत उतरविण्याचे आदेश नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भाेसले यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यांचे आदेशाचे पालन करीत रस्त्याचे कडेला उभारलेले बहुतांश फलक कार्यकर्त्यांनी काढले.
सातारा शहर परिसरात उभारलेला शुभेच्छा फलक फाडल्याच्या संशयावरून शनिवारी (ता.25) शहरातील काही युवकांनी दोन युवकांना मारहाण करत त्यांना आपल्या ताब्यात ठेवले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी बोगदा परिसरात कारवाई करत दोघांची सुटका केली. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते शहर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होत्या.
गुरुवारी (ता.23) सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयाप्रित्यर्थ शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात फलक उभे केले. त्यामधील एक फलक अनोळखी व्यक्तीने फाडला. फलक फाडल्याचे लक्षात आल्यावर त्याच परिसरातील युवकांनी चौकशी केली. त्यावेळी फलक फाडणारा युवक शिवराज पेट्रोल पंप परिसरातील असल्याचे समजले. यामुळे मिळालेल्या माहितीनुसार व संशयावरून युवकांनी तेथे जाऊन दोन युवकांना पकडले. मारहाण करत त्यांना चार चाकीतून बोगदा परिसरात नेले. तेथे त्यांना पुन्हा मारहाण केली. बोगदा परिसरात काही जणांना मारहाण होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी तेथे गेले. त्यांनी त्या युवकांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.त्यांना चारचाकीतून कोणत्या युवकांनी, कशासाठी नेले होते याची चौकशी सुरू होती.
दरम्यान ही बाब खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहचली. दुष्काळी परिस्थितीत विजयोत्सव साजरा करणे योग्य ठरणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले होते. तरीही कशासाठी शुभेच्छा देणारे फलक उभारले असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला.जे झाले त्याची चौकशी पोलिस करतील परंतु ज्यांनी ज्यांनी शुभेच्छापर फलक लावले आहेत त्यांनी ते तातडीने काढावेत अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांनी केली. उदयनराजेंच्या सूचनेनूसार रात्रीत शहरातील बहुतांश ठिकाणचे फलक उतरविण्यात आल्याचे आज (रविवारी, ता.27) निदर्शनास आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje bhonsle orders karykarta to remove compliment boards