Election Results : उदयनराजेंच्या यशाचे हे आहेत शिल्पकार

शुक्रवार, 24 मे 2019

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. 
​उदयनराजेंच्या विजयासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसच्या आमदारांनी दिवसाची रात्र करुन परिश्रम घेतले. पाटण व कऱाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ वगळता सातारा, काेरेगाव, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना लक्षणीय मताधिक्य मिळाले आहे. 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. 
​उदयनराजेंच्या विजयासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसच्या आमदारांनी दिवसाची रात्र करुन परिश्रम घेतले. पाटण व कऱाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ वगळता सातारा, काेरेगाव, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना लक्षणीय मताधिक्य मिळाले आहे. 
गुरुवारी (ता.23) झालेल्या मतमाेजणीमधील 20 व्या फेरी अखेर कोरेगाव मतदार संघातून उदयनराजेंना 33 हजार 316 मतांची माेठी आघाडी मिळवून दिली. येथे उदयनराजेंना 1 लाख 274 तसेच नरेंद्र पाटील यांना 66 हजार 958 मते मिळाली. 
महायुतीचे पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी कोरेगावात येऊन जोरदार रान उठवलेले असतानाही राष्ट्रवादीने सोपवलेल्या जबाबदारीनुसार उदयनराजे यांना आघाडी मिळवून देण्यात आमदार शशिकांत शिंदे यशस्वी ठरले असले तरी प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळालेला असतानाही नरेंद्र पाटील यांनी मिळवलेली मते दुर्लक्षून चालणार नाहीत. 
वाई विधानसभा मतदारसंघात मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीला बसेल, अशी शक्‍यताही गृहीत धरण्यात आली होती. मात्र, वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनी ताकद पणाला लावल्यामुळे उदयनराजेंना 20 व्या फेरीत 30 हजार 412 मतांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये उदयनराजेंना 1 लाख 438 तसेच नरेंद्र पाटील यांना 70 हजार 26 मते मिळाली आहेत.
देशात, राज्यात भाजप- शिवसेना युतीची लाट असतानाही माजी आमदार मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अपेक्षित प्रभाव येथे पडला नाही. हे युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पडलेल्या मतांवरून स्पष्ट होत आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाने उदयनराजेंना अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मताधिक्‍य देत, राष्ट्रवादीचा गड भक्कम असल्याचे सिद्ध केले. दोन्ही कॉंग्रेसने प्रचारात राखलेला समन्वय व सातत्याने आघाडी धर्मासाठी तत्परता व आमदार बाळासाहेब पाटील यांची मतदारसंघावरील मजबूत पकड यामुळे उदयनराजेंना 38 हजार 963 मिळालेले मताधिक्‍य मोलाचे ठरले आहे. यामध्ये उदयनराजेंना 1 लाख 4 हजार 437 तसेच नरेंद्र पाटील यांना 65 हजार 474 मते मिळाली आहेत.
उदयनराजेंच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे उदयनराजेंच्या मताधिक्‍याला हातभार लागला.
सातारा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मताधिक्‍याबाबत खासदार उदयनराजेंची निराशाच केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले व खासदारांमध्ये झालेला टोकाचा संघर्ष व त्यानंतरचे मनोमिलन कार्यकर्ते व जनतेच्या पातळीवर रुजविण्यात आलेले अपयश यातून स्पष्ट होत आहे. दोन्ही नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा कौल या मतदार संघातील जनतेने दिला आहे. 20 व्या फेरी अखेर उदयनराजेंना 31 हजार 13 इतके मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये उदयनराजेंना 95 हजार 908 तसेच नरेंद्र पाटील यांना 64 हजार 895 मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत उदयनराजेंना तब्बल 80 हजारांचे मताधिक्‍य होते.
यंदाच्या निवडणुकीत सर्वांच्या नजरा पाटण तालुक्‍याकडे होत्या. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे तालुक्‍याचे भूमिपुत्र आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असल्याने पाटील यांना चांगले मताधिक्‍य मिळेल, अशी आशा सर्वांना होती; पण या निवडणुकीच्या निमित्ताने आकडेवारी पाहता येथे पारंपरिक देसाई-पाटणकर असा जंगी सामना पाहावयास मिळाला. त्यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांनीही आगामी विधानसभेची झलक आमदार शंभूराज देसाई यांना दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. नरेंद्र पाटील यांना 20 व्या फेरीअखेर मिळालेले 18 हजारांचे मताधिक्‍य अल्पच असल्याचे चर्चेले जात आहे. उदयनराजेंना 67 हजार 439 तसेच नरेंद्र पाटील यांना 85 हजार 446 मते मिळाली आहेत. 
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीविरोधात निर्माण केलेले वातावरण मतदानात परावर्तित करण्यात भाजप व शिवसेनेला म्हणावे असे यश मिळाले नाही. पण, त्या वातावरणाचा व ठराविक विचारसरणीत मतदार वाहून जावू नये म्हणून कॉंग्रेसने केलेली पेरणी उदयनराजेंच्या विजयासाठी उपयुक्‍त ठरली. 
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अथक परिश्रमामुळे दक्षिणेतून युतीला मिळणारे मताधिक्‍य रोखण्यात आघाडीला यश आले. फार मोठे मताधिक्‍य मिळेल, असे वातावरण निर्माण केले असताना, दक्षिणेच्या मतदारांनी नरेंद्र पाटील यांना केवळ पाच हजारांच्या आसपास मताधिक्‍य दिले. ते मागील लोकसभेपेक्षा कितीतरी पटीने कमीच होते. या मतदारसंघात 20 व्या फेरी अखेर उदयनराजेंना 81 हजार 829 तसेच नरेंद्र पाटील यांना 86 हजार 657 मते मिळाली आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanrajes victory credit goes to Mla