Loksabha 2019 : घातकी शेट्टींना पुन्हा संधी नको

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मी शेतकऱ्यांचा नेता नसलो तरी मित्र आहे. त्यांच्या भावना मला कळतात. शिवसेनाच शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होती. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांना पेन्शन देणारे आपलेच सरकार असेल.’’

इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त सांडणाऱ्या नतद्रष्टांना पुन्हा का संधी द्यायची, आंदोलनं करून काही तरी मिळविण्याची नाटकं आणि थेरं आम्ही करीत नाही. आम्ही थेट प्रश्‍न सोडविण्यावर भर देतो, असे म्हणत त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे 
आवाहन केले. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘गेल्यावेळी मतदारसंघ सोडून चूक केली, ती दुरुस्त करायला व हक्काची जागा या वेळी जिंकण्यासाठी आलोय. तरुण रक्त पुढे आलेय. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यशील माने आहेत. बाळासाहेबांच्या शिकवणीला स्मरून त्याला संधी दिलीय. शेट्टींची शाळा कशी चालते हे समजले, आता पुन्हा चूक नको. काही लोक डोळ्यात पाणी आणण्याचे नाटक करतात. त्याऐवजी शेतीला पाणी द्या. राज्यावर आस्मानी संकट आहे.

युती करताना मोदी शेतकऱ्यांच्या सोबत राहतील, असा शब्द घेतला आहे. मला मंत्रिपदांची चिंता नाही. जे होईल ते होईल. सरकारच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. जे केले ते रोखठोकपणे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठीच निर्णय घेतले. यापुढेही पूर्ण ताकदीने त्यांच्यासाठी लढेन. उसाचा प्रश्न परत निर्माण झाला तर सत्तेत असलो तरी तुमच्यासोबत असेन. कर्जमाफीचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचेल. मी शेतकऱ्यांचा नेता नसलो तरी मित्र आहे. त्यांच्या भावना मला कळतात. शिवसेनाच शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील होती. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांना पेन्शन देणारे आपलेच सरकार असेल.’’

ते म्हणाले, ‘‘शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत, सरकार कसे संवेदनशील असले पाहिजे त्याचे हे सरकार चांगले उदाहरण आहे. एस. टी. पासला पैसे नाहीत म्हणून शाळकरी मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर तत्काळ सावित्रीबाई फुले योजनेतून बसभाडे माफ केले. मोदी पुन्हा सत्तेत येणारच. महाआघाडीच्या एकानेही त्यांचा पंतप्रधान कोण हे सांगावे. सावरकरांची नक्कल करणाऱ्या राहुल गांधींची पंतप्रधान होण्याची लायकी नाही.

खासदार म्हणून त्यांनी निवडून येऊ नये. सावरकरांचा त्याग विसरता येणार नाही. नेहरूंनी सावरकरांच्या इतके स्वातंत्र्यासाठी हाल सोसले असतील तर त्यांना मी वीर म्हणायला तयार आहे. देशद्रोहाचे कलम काढून टाकायला ही त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती आहे का? मतांसाठी त्यांना देशद्रोही चालतात, या नालायक कार्ट्याच्या हातात देश देणार आहोत का? सत्तेत आल्यावर काश्‍मिरमधील ३७० वे कलम काढून टाकू. काश्‍मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. राम मंदिरचा मुद्दा घेणारच.’’

राष्ट्रवादीवाले टपून होते 
शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही? असे म्हणून अनेकदा आमच्यावर टीका झाली. जर आम्ही आवाज उठवल्यावर शेतकरी, सामान्यांचे प्रश्‍न सुटले असतील तर साथ सोडायला कपाळकरंटे नाही. त्यातूनही साथ सोडली असती. मात्र राष्ट्रवादीवाले याची वाट पाहत बसले होते. आम्ही कधी बाहेर पडतोय आणि त्यांना कधी आत जायला मिळतेय. ते उतावळे होते, अशी टीका श्री. ठाकरे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर 
शरद पवार यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी दादांच्या पाठीत खंजीर खुपसला. ते सत्तेत गेले. शेतकरी आंदोलन करीत असताना काँग्रेसच्या सरकारने आंदोलकांवर गोळ्या घातल्या. त्यांना ठार मारले. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालून शेट्टी आता त्यांच्या मांडीवर बसले आहेत. त्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे ज्यांनी दादांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आता मते देऊन निवडून देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray comment in Islampur