Loksabha 2019 : अमित शहा 19 एप्रिलला बारामतीत घेणार सभा

मिलिंद संगई
रविवार, 14 एप्रिल 2019

काल मध्यरात्री पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अमित शहा यांच्या बारामती सभेची तारीख निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे नरेंद्र मोदी हे सभेसाठी वेळ देऊ शकत नसल्याची अडचण लक्षात घेत भाजपने आता अमित शहा यांना बारामतीच्या रिंगणात उतरण्याचे निश्चित केले आहे.

काल मध्यरात्री पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अमित शहा यांच्या बारामती सभेची तारीख निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शहा यांनीच बारामतीची जागा यंदा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच, असा निर्धार व्यक्त केला आहे.  त्या पार्श्वभूमीवर आता स्वतः अमित शहा हे बारामतीच्या रणांगणात उतरणार असल्याने सुप्रिया सुळे विरुध्द कांचन कुल या लढतीकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

अमित शहा बारामतीत सभा घेणार असल्याच्या वृत्ताने भाजप कार्यकर्त्यांच्या गोटातही आता उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.  दरम्यान अमित शहा यांच्या समवेतच गिरीश महाजन हे देखील माळेगाव व सणसर येथे सभा घेणार असून पंकजा मुंडे यांच्या ही दोन सभा बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांनी दिली.  शेवटच्या टप्प्यात राम शिंदे हेही बारामतीत येऊन सभा घेणार आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे देखील बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यंदा बारामतीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.  एकीकडे नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांना लक्ष केले असून दुसरीकडे अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. पवारांना कोणत्याही परिस्थितीत बारामतीच अड़कवून ठेवण्याची ही खेळी असल्याचे राजकीय निरिक्षक मानतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah will be holding the meeting in Baramati on 19th April