Loksabha 2019 : सभा पुण्यात; लक्ष्य बारामती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

‘सेल्फीवाली ताई गल्लीत, कांचन कुल दिल्लीत’, ‘दिल्लीत कुल आणि बाकी सगळे गुल’ अशी बोचरी टीका करत बारामतीमध्ये परिवर्तन करून देशात इतिहास घडविण्याचा निर्धार नेत्यांनी केला.

पुणे - महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची सभा नरपतगीर चौकात झाली. या वेळी भाजप-शिवसेनेसह महायुतीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पुण्यापेक्षा बारामतीलाच लक्ष्य केले. ‘सेल्फीवाली ताई गल्लीत, कांचन कुल दिल्लीत’, ‘दिल्लीत कुल आणि बाकी सगळे गुल’ अशी बोचरी टीका करत बारामतीमध्ये परिवर्तन करून देशात इतिहास घडविण्याचा निर्धार नेत्यांनी केला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महायुती पुणे आणि बारामतीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकणार आहे. बापट देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येणार आहेत; पण देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे आहे. कांचन कुल या विजयी होऊन देशात इतिहास घडविणार आहेत.’’  

‘‘खरे परिवर्तन बारामतीत होणार असल्याने देशाचे लक्ष इकडे लागले आहे,’’ असे सांगत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ‘सेल्फीताई गल्ली मैं कांचनताई दिल्ली मै’ अशी टीका केली. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर म्हणाले, ‘‘मागच्या वेळेस माझा थोडक्‍यात पराभव झाला. आता कांचन कुल यांना दिल्लीत पाठवायचे आहे. या वेळी बारामती हे देशातील परिवर्तनाचे केंद्र असेल.’’ 

शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतून काँग्रेस-राष्ट्रवादी उणे होणार आहे. गल्लीतील उंदीर गल्लीत ठेवायचे असेल तर आपले उमेदवार दिल्लीत पाठवले पाहिजेत. यासाठी महायुती सक्षम आहे.’’  

‘‘महायुती पश्‍चिम महाराष्ट्रातील १० जागा जिंकणार आहे. सुप्रिया सुळेंचा एक लाख मतांनी पराभव करू,’’ असे खासदार संजय काकडे म्हणाले.

काँग्रेसचा उमेदवार बापट यांना विचारूनच  
कालपर्यंत यांना उमेदवार सापडत नव्हता. ज्यांना उमेदवार मिळत नाही, ते शहराचे काय रक्षण करणार, असा प्रश्‍न महापौर मुक्ता टिळक यांनी केला; तर काँग्रेसचा उमेदवार बापट यांना विचारून ठरवलेला आहे, असे बोलले जात असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये - बापट 
सभेमध्ये बापट म्हणाले, ‘‘आयुष्यभर घाम गाळून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सलाम. कार्यकर्ता आमचा आत्मा आहे. मी घराणेशाहीत पैदा झालेलो नाही, तर माझ्यावर संघाचे संस्कार आहेत. मला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी आशीर्वाद द्या. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, घरोघरी जाऊन प्रचार करावा.’’

दरम्यान, मोहन जोशी यांना काँग्रेस आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्याबाबत पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, ‘‘परीक्षेचा पेपर कसाही असो, मी अभ्यास करूनच जातो. त्यामुळे मी पासच होतो. सर्वच पक्षांत माझे मित्र आहेत. शत्रुत्व कोणाशीही नाही; पण जेव्हा पक्षाचा विषय येतो, तेव्हा मी माझ्या विचारांवर ठाम राहतो. त्यामुळे ही निवडणूक बापट विरुद्ध जोशी अशी लढाई नसून, ती विचारांची लढाई आहे. यामध्ये महायुतीचा विजय होणार आहे.’’ 

कशाला कोणाची भीती, सोबत आहे महायुती - कुल 
‘कशाला कोणाची भीती, सोबत आहे महायुती’ असा विश्‍वास व्यक्त करीत कुल म्हणाल्या, ‘‘माझ्या पाठीशी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील कार्यकर्ते आहेत. ही निवडणूक माझी नसून, जनतेनेच यामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे. बारामतीमध्ये आम्ही फिरलो. त्यात एका ठिकाणी विकास आहे, बाकी ठिकाणी भकास आहे. आम्ही बारामती मतदारसंघात सर्वांचा समान विकास करू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate meeting in Pune and Target Baramati