Loksabha 2019 : दौंडमध्ये मतदानानंतर भाजप शहराध्यक्षांचा राजीनामा

प्रफुल्ल भंडारी 
गुरुवार, 25 एप्रिल 2019

उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

लोकसभा 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे यांच्याकडे फिरोज खान यांनी राजीनामा पाठविला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मागील दीड वर्षांपासून दौंड शहारत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते वेळोवेळी पक्षादेशानुसार निवडणुकीची तयारी करण्यासह शक्तीकेंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. परंतु लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नाही आणि साधा संपर्क देखील साधण्यात आला नाही. तरीदेखील कार्यकर्ता या नात्याने पक्ष उमेदवाराचे प्रचाराचे काम निष्ठेने करण्यात आले. कांचन कुल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या सर्व जबाबदाऱ्या आणि बैठकांचे नियोजन पक्षाबाहेरील लोकांना देण्यात आल्याची खंत राजीनामा पत्रात नमूद करण्यात आली आहे. 

कार्यकर्त्यांसाठी वॅाररूम का नाही ?
भाजपाकडून पक्षकार्य आणि निवडणुकीसाठी वॅाररूम असून त्याद्वारे चोवीस तास कार्यकर्त्यांना कामे लावली जातात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्यासाठी पक्षाने कोणतीही वॅाररूम स्थापन न केल्याची खंत फिरोज खान यांनी व्यक्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP city president resigns after polling in Daund