Loksabha 2019 : देशाला स्थिर सरकार आणि स्थैर्याची गरज : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे, नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी जनतेने उभे रहावे.

बारामती : गेल्या पाच वर्षात सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले, या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे, नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी जनतेने उभे रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी (ता. 21) बारामतीत झाली, त्या प्रसंगी पवार बोलत होते.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे,  माजी मंत्री अनिल देशमुख, जयदेव गायकवाड, पौर्णिमा तावरे, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले,  राज्यातील प्रश्नांबाबत तसेच विकासाच्या मुद्द्यांबाबत न बोलता केवळ पवारांनी गांधी कुटुंबात कुटुंबावर टीका करणे इतकेच काम या दोघांनी केले.  आमच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या,  मात्र गेल्या पाच वर्षांत 11 हजार 998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या केल्या अशी माझी माहिती आहे.  ही परिस्थिती बदलायची असेल तर कर्जमुक्ती ची गरज आहे,  ही कर्जमुक्ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार देईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

 एकीकडे बड्या उद्योजकांची कर्जमाफी करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का असा सवाल करत पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.  माझे बोट धरून राजकारणात आले आलो असे मोदी सांगत आहेत आणि दुसरीकडे ते बेधडकपणे खोटे बोलतात मला तर आता याची भीतीच वाटू लागली आहे,  आता मी डॉक्टरांकडे जाऊन माझ्या बोटाचीच तपासणी एकदा करून घेणार आहे अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.  अमित शहा यांनी बारामतीत येऊन पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा ही त्यांनी समाचार घेतला. सैन्याच्या पराक्रमाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. 

सुप्रिया सुळे यांनीही आपल्या पाच वर्षातील कामगिरीच्या जोरावर निवडून द्यावे असे आवाहन केले. अजित पवार यांनी जिरायत भागात साठवण तलाव करुन प्रत्येक गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून जिरायत भाग टँकरमुक्त करु अशी ग्वाही या वेळी दिली. 

अमित शहांनी डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन घ्यावी...
बारामतीत काय केले असे विचारणाऱ्या अमित शहा यांनी डोळ्यावर शस्त्रक्रीया करुन घ्यावी, असा टोमणा मारत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर तोफ डागली. माझ्यावर टीका करणाऱया सर्वांचे मी खासदार झाल्यावरही बारामतीत स्वागतच करेन, त्यांनी कितीही विरोध केला तरी मी त्यांचे स्वागत करेन कारण माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country needs a stable government and stable status says Sharad Pawar