Loksabha 2019 :  याद्यांतील त्रुटी, तापमानामुळे घटले मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

मतदार याद्यांतील त्रुटी, झोपडपट्ट्या-वस्तीपातळीपर्यंतच्या मतदारांपर्यंत पोचण्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आलेले अपयश अन मर्यादित प्रचार आदी कारणांमुळे निम्म्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे.

पुणे - मतदार याद्यांतील त्रुटी, झोपडपट्ट्या-वस्तीपातळीपर्यंतच्या मतदारांपर्यंत पोचण्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आलेले अपयश अन मर्यादित प्रचार आदी कारणांमुळे निम्म्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. स्टार प्रचारकांनी पुण्याकडे पाठ फिरविल्यामुळे राजकीय वातावरण तापले नाही अन्‌ उन्हाचा तडाखा वाढल्यामुळेही मतदानावर परिणाम झाला. 

लोकसभा निवडणुकीसाठी शहरात मंगळवारी ४९.८४ टक्के मतदान झाले. सुमारे २१ लाख मतदारांपैकी निम्म्याच मतदारांनी मतदान केले आहे. मतदान जास्त संख्येने होण्यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोगानेही प्रयत्न केले होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावरील फारसे राजकीय नेते पुण्यात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान पुण्यात मुक्काम केला; परंतु, त्यांची सभा अथवा बैठक झाली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा बारामतीमध्ये रोड शोसाठी आले; परंतु, पुण्यात त्यांचा कार्यक्रम झाला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फक्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रियांका गांधी यांचा रोड शो झालाच नाही. तसेच दोन्ही पक्षांतील राष्ट्रीय नेतेही शहरात आले नाहीत.

याबाबत भाजपचे कार्यकर्ते सुहास कुलकर्णी म्हणाले, ‘‘मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत. मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळलेली नाहीत. तसेच, मतदान केंद्रांत झालेला बदलही मतदारांपर्यंत पोचला नव्हता.’’

येरवड्यातील बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील प्रा. नितीन बिरमल म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी राजकीय पक्षांचे नेटवर्क भक्कम आहे, तेथे मतदान चांगले झाल्याचे कोथरूड, पर्वतीमधून दिसून आले. तसेच वस्तीपातळीपर्यंत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फारसे पोचू शकले नाही, त्यामुळे मतदान कमी झाले.’’

महापालिकेची जबाबदारी
मतदार नोंदणी, पत्त्यातील बदल, मयत मतदारांची नावे बदलणे आदींसाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे. तसेच मतदार याद्या निश्‍चित करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविणे गरजेचे आहे, असे मत एका प्रशासकीय अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

मतदान कमी होण्याची कारणे?
  मतदार याद्यांतील त्रुटी, मतदान केंद्रांत झालेले बदल 
  राजकीय वातावरण 
तापले नाही 
  झोपडपट्ट्या-वस्तीपातळीपर्यंत पोचण्यात कार्यकर्त्यांना अपयश 
  उन्हाचा तडाखा; कार्यकर्त्यांमधील निरुत्साह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased polling due to temperature in pune