Loksabha 2019 : पहारेकरी, चौकीदार दोघेही चोर - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली.

भोसरी - ‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी गावजत्रा मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी डॉ. कोल्हे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार विलास लांडे आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास दूरचित्रवाणी मालिकांमधून नागरिकांपर्यंत पोचविणारे डॉ. कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत. नागरिकांनी या मावळ्याला मतांचा आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठवा.’’

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संरक्षण खात्याविषयी १२५ प्रश्‍न विचारले. मात्र, त्यामध्ये एकही प्रश्‍न रेडझोनसंदर्भात नाही. सर्वाधिक प्रश्‍न संरक्षण खात्याच्या साहित्यखरेदीवर विचारले आहेत. जनतेने त्यांना त्यांच्या कंपनीच्या हितासाठी नाही, तर जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे.’’

दिलीप सोपल म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अमित शहा मुंबईत आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना अफजल खान संबोधले होते. ते राज्यावरील संकट असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची गळाभेट झाली. तेव्हा नुसत्या पोटाला गुदगुल्या करून ते परत आले...’’ तेव्हा एकच हशा पिकला.

‘व्ही’ फॉर व्हिक्‍टरी’
मतदानयंत्रामध्ये (ईव्हीएम) पहिल्या क्रमांकावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे, तर दुसऱ्या क्रमांकावर डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव आहे. हा धागा पकडून कोल्हे यांनी दोन क्रमांकासाठी इंग्रजीतील ‘व्ही’ आकारासारखी हाताची दोन बोटे वर केली. त्यावर नागरिकांमधून  ‘व्ही फॉर व्हिक्‍टरी’ अशी घोषणा देण्यात आली. त्यानंतर एक क्रमांकासाठी त्यांनी क्रिकेटमधील अम्पायरसारखे हाताचे एक बोट वर करताच नागरिकांनी ‘आउट’ अशा घोषणा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde was speaking in the meeting to campaign for Amol Kolhe