Loksabha 2019 : मावळमध्ये मतदानाची अंतिम टक्केवारी 65 पर्यंत जाण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 April 2019

पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. निवडणूक विभागाच्या दुपारी तीनपर्यंतच्या आकडेवारीनुसार 41.30 टक्के मतदान झाले होते. हिच गती कायम राहिली तर मतदान 65 टक्‍क्‍यापर्यंत जाईल, असा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा 43 अंशापर्यंत चढलेला पारा 38 अंशापर्यंत घसरल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. निवडणूक विभागाच्या दुपारी तीनपर्यंतच्या आकडेवारीनुसार 41.30 टक्के मतदान झाले होते. हिच गती कायम राहिली तर मतदान 65 टक्‍क्‍यापर्यंत जाईल, असा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
 
मावळमधील सहाही विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसते. बहुतांश ठिकाणी रांगा आहेत. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत येथे पाहायला मिळत आहे. यापैकी आपला खासदार कोण, हे 22 लाख 97 हजार 405 मतदार आज ठरवत आहेत. यासाठी तब्बल दोन हजार 504 मतदान केंद्रे उभारली आहेत. 

पुणे जिल्ह्यात समावेश होणाऱ्या पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल व कर्जत या विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाने होरपळला आहे. याचा परिणाम तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर मोठ्या प्रमाणावर झाला होता. यामध्ये 23 एप्रिलला पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी घसरली होती. या पार्श्‍वभूमीवर चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मावळ मतदारसंघात काय होणार, याची चिंता राजकीय पक्षांना होती. रविवारी (ता. 22) पुण्यातील तापमान 43.3 अंश सेल्सियस इतके नोंदले गेले. या पार्श्‍वभूमीवर मावळमधील टक्केवारीत घट होईल अशी शक्‍यता वर्तविली जात होती. 2014 मध्ये 60.61 टक्केवारी होती. 

सोमवारी सकाळी तुलनेत हवेत गारवा होता. तसेच ऊन वाढण्यापूर्वी मतदान करावे, अशा अंदाजाने सकाळी सातपूर्वीच मतदार घराबाहेर पडले होते. त्यामुळे सर्वच मतदारसंघांबाहेर रांगा लागल्या होत्या. या गर्दीमध्ये वाढच होत राहिली. सकाळी नऊपर्यंत 6.15 टक्के मतदान झाले. यामध्ये उरण व चिंचवड टक्केवारीमध्ये पुढे होते. अकरापर्यंत हीच आकडेवारी 19.72 टक्‍क्‍यांवर पोचली. नंतर दोनला ती 31.85 टक्के झाली. यामध्ये सहापैकी चिंचवडमध्ये सर्वाधिक 35.08 टक्केवारी होती. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बारणे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप राहतात. सुरवातीपासून भाजपला मानणारा वर्ग येथे आहे. दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी पनवेल विधानसभा मतदारसंघात 31.90 होती. याचे प्रतिनिधीत्व भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे आहे. यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची टक्केवारी शिवसेना आमदार असलेल्या उरणमधील 31.40 टक्के, चौथ्या क्रमांकाची टक्‍केवारी 30.10 मावळमधील असून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 

मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे. ज्येष्ठ, दिव्यांगांना रांगेमध्ये अग्रक्रम दिला जात होता. त्यांच्यासाठी स्वयंसेवक मदत करत होते. मतदानासाठी एकत्रित कुटुंबे येत असल्याचे दिसत आहे. अजूनपर्यंत कोठेही गोंधळाचे प्रसंग उद्‌भवलेले नाही. दुपारी साडेचारनंतर मतदारांची गर्दी आणखी वाढेल, असा अंदाज निवडणूक विभागाचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final Voting Percentage in Maval can go up to 65 percent