Loksabha 2019 :  देश भगवा करण्याच्या तयारीत भाजप - सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

‘‘साध्वी व साधूला निवडणुकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे. त्यांना आताच रोखले पाहिजे; अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास मोदी-शहा हुकूमशहा होतील,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

पुणे - ‘‘साध्वी व साधूला निवडणुकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे. त्यांना आताच रोखले पाहिजे; अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास मोदी-शहा हुकूमशहा होतील,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ भवानी पेठेत संविधान बचाव निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उमेदवार मोहन जोशी, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, माजी महापौर रजनी त्रिभुवन, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे प्रकाश भालेराव उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘आघाडीमुळे आपला पुण्यात विजय होईल. देश बदलण्याची भाषा करणाऱ्या मोदींनी देशाची वाट लावली आहे. ज्यांनी गोध्रा हत्याकांडात मोदींना वाचविले, त्या अडवानींना उमेदवारीही दिली नाही. तसेच ज्या डॉ. बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला, त्यांचे नातू जातीयवादी संघटनेला सोबत घेऊन भाजपला मदत करीत आहे.’’ राहुल डंबाळे, करण मकवानी, गौतम आर्केडे, अविनाश बागवे, महेश शिंदे यांचेही भाषण झाले.

ही निवडणूक ऐतिहासिक आहे. या निवडणुकीतून लोकशाही वाचवायची आहे. संविधानाने या देशाला मजबूत लोकशाही दिली. त्यास भाजपवाले सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- मोहन जोशी, उमेदवार, काँग्रेस महाआघाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Union home minister and chief minister Sushilkumar Shinde says BJP of trying to change India into a Hindu Rashtra