Loksabha 2019: मी काँग्रेसमध्येच; महाआघाडीचेच काम करणार- हर्षवर्धन पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

- मी कॉंग्रेसमध्येच, महाआघाडीचे काम स्वयंस्फूर्तीने करीत आहे
 - माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण

इंदापूर: विजयसिंह मोहिते पाटील लाखेवाडीला एका कार्यकर्त्याच्या सांत्वनासाठी गेले होते. तेथून ते बावड्याला आले. आमच्यात झालेली भेट कोणतीही गुप्त भेट नव्हती. मी कॉंग्रेसमध्येच आहे आणि महाआघाडीचे काम स्वयंस्फूर्तीने, मनापासून करीत असल्याचे माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आज कॉंग्रेसचा मेळावा आयोजित केला असतानाच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील व सुप्रिया सुळे हे इंदापूरमध्ये आघाडीच्या व्यासपीठावर एकत्र आल्याने सकाळी सुरू झालेल्या राजकीय चर्चा अफवा होत्या अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.


राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी धर्म पाळत नाही अशी तक्रार करीत कॉंग्रेस कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारापासून दूर होते. दरम्यानच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, त्यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत आघाडीतील मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस सुप्रिया सुळे यांचा मनापासून प्रचार करेल अशी ग्वाही दिली होती.

 

Web Title: Harshavardhan patil clears the air about entering into BJP