Loksabha 2019 : मावळ व शिरूर मतदारसंघात टक्का वाढविण्याचे दिव्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 April 2019

चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. 

पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. 

मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यासाठी बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे. मात्र, त्यापूर्वीचे दोन दिवस चौथा शनिवार व रविवारची सुटी आहे. नेहमी ‘विकएंड’ शहराबाहेर घालविणाऱ्यांना सोमवारचीही सुटी मिळाली आहे. याचा फटका मतदानाला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगातर्फे भित्तिपत्रके, फलक, पथनाट्य, कार्यशाळा, पदयात्रा या माध्यमातून मतदार जागृती सुरू आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मतदानासाठी नागरिकांना विनंती करीत आहेत. 

लोणावळा, खंडाळा बुकिंग
मावळ व शिरूर मतदारसंघात पिंपरी-चिंचवडसह तळेगाव दाभाडे, उर्से, टाकवे, उरण, पनवेल, चाकण, म्हाळुंगे, मरकळ, रांजणगाव, शिक्रापूर एमआयडीसीचा आणि तळवडे, खराडी, हडपसर भागातील आयटी  कंपन्यांचा समावेश होता. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे बहुतांश आयटीयन्स शहरातील पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड भागात राहतात. त्यांच्यासह बहुतांश कंपन्यांनी सोमवारी मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. मात्र, बहुतांश आयटीयन्स व पनवेल, उरण भागातील नागरिक ‘विकएंड’साठी लोणावळा, खंडाळ्याला पसंती देतात. याचा परिणाम मावळमधील मतदानावर होऊ शकतो. कारण, लोणावळा, खंडाळा भागातील रिसॉर्ट, लॉज, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ यांच्याकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत शनिवार, रविवारसाठी ६० टक्‍क्‍यांवर बुकिंग झाले होते. बुकिंगसाठी चौकशीचे फोन सुरू होते. या विकएंडला जोडूनच सोमवारचे बुकिंगही होऊ शकते. 

शाळेलाही सुटी
बहुतांश शाळांचे वार्षिक परीक्षेचे निकाल गुरुवारी जाहीर केले. काही शाळा शुक्रवार व काही शनिवारी जाहीर करणार आहेत. त्यांचा निकाल हाती मिळताच अनेकांनी आपल्या मूळगावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषतः महिलांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. उन्हाळी सुटी आणि लग्नसराईमुळे अनेक जण मूळगावी जात असतात. याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता आहे. २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात ६०.११, तर शिरूर मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले होते. ही टक्केवारी वाढविण्यासाठीचे  प्रयत्न सुरू आहेत. 

पुण्याप्रमाणे होऊ नये...  
पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३) मतदान झाले. त्याची टक्केवारी केवळ ४९.८४ होती. म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या निवडणुकीत पुण्यात ५४ टक्के मतदान झाले होते. या वेळी जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगासह संस्था, संघटनांनी मतदार जनजागृतीवर भर दिला होता. मात्र, प्रत्यक्षात कमी मतदान झाले. मावळ व शिरूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कार्यकर्ते मतदारांना मतदानाची विनंती करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase the percentage in Maval constituency and shirur constituency