Loksabha 2019 : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

लोकसभेच्या पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची उद्या (रविवारी) सायंकाळी सांगता होत आहे.

पुणे : लोकसभेच्या पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची उद्या (रविवारी) सायंकाळी सांगता होत आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यात रविवार असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. प्रत्यक्ष प्रचारासोबतच या वेळी उमेदवारांनी सोशल मीडियावरही प्रचार रंगविला.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी पाचला होत आहे. आजही पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन सभा घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन प्रचाराचे वातावरण तापविले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी संपूर्ण शहरात रॅली काढली. रात्री दहापर्यंत विविध नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा सुरू होत्या.

प्रचाराच्या समारोपासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी विधानसभेच्या सहाही मतदारसंघांत रॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. त्याचे नियोजन स्थानिक आमदार-नगरसेवकांवर सोपविण्यात आले आहे. प्रचार कसा राहिला, याबाबत स्वतः बापट हे पत्रकार परिषदेद्वारे माहितीही देणार आहेत. नगरसेवकांनी आपला भाग न सोडता आपल्याच परिसरात शेवटच्या दिवशी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्याचे समजते.
 
कॉंग्रेसच्या वतीने समारोपाची सभा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत दुपारी तीनला महात्मा फुले मंडई येथे होणार आहे. त्यापूर्वी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी संपूर्ण प्रचाराचा आढावा घेणार आहेत. वंचित विकास आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा "एसएसपीएमएस' मैदानावर होत असून, या सभेची पक्षाच्या वतीने जोरदार तयारी केली आल्याचे आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
 
जाहीर सभा, पदयात्रा, कोपरा सभा, बैठका, विविध समाजांचे मेळावे यासोबतच यंदा सर्व उमेदवारांनी सोशल मीडियावरूनही प्रचाराची स्वतंत्र यंत्रणा उभारली होती. प्रचारगीते, प्रचारासाठी एलईडी स्क्रीन, सायकल गाड्या आदींचा वापर करण्यात आला. बापट, जोशी यांनी सोशल मीडियावरूनही घरोघरी पोचण्याचा प्रयत्न केला. 

असा राहणार आजचा प्रचार 
- सहाही विधानसभा मतदारसंघांत भाजपची रॅली 
- पन्नाप्रमुखांमार्फत घराघरांत जाण्याचा संकल्प 
- कॉंग्रेसच्या समारोपाची सभा महात्मा फुले मंडईत होणार 
- प्रकाश आंबेडकर, खासदार ओवेसींच्या तोफा धडाडणार 
- प्रचार सांगतेनंतर उमेदवारांच्या वतीने संपर्काची खास यंत्रणा 
- मतदानासाठी मतदारांना बाहेर काढण्यासाठीही उमेदवारांचे प्रयत्न 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last day of Election campaign